यवतमाळ- शहरातील साडेतीन लाख नागरिकांची तहान भागविणाऱ्या निळोना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कुदळ, फावडे घेऊन श्रमदान केले.
यवतमाळ तालुक्यातील बरबडा येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने निळोना धरणातील गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी यंत्राचे पूजन केले. तर लासिना येथील नालाखोलीकरणाच्या कामावर उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार शैलेश काळे यांनी श्रमदान केले.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी बरबडा येथील इक्लास जमिनीवर सलग समतल चर खोदण्यात येणार आहेत. आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी प्रयास व ग्रामस्थ यांच्या श्रमदानात सहभागी होऊन जलसंधारणाच्या कामात योगदान दिले.
जलसंधारणाचे काम अतिशय महत्वपूर्ण असल्याने प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. यातून आपले गाव समृद्ध करता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रयासचे डॉ. विजय कावलकर, प्रशांत बनगिनवार, प्रा. देशमुख, डॉ. आलोक गुप्ता, पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक समाधान इंगळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.