यवतमाळ - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा तसेच राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज (दि. 21 मार्च) यवतमाळ शहरातील दत्त चौकात आंदोलन करण्यात आले. राज्यात कोणाच्या काळात नागरिकांना आतचा रोजगार गेला. त्यांना खायला नाही रोटी आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना पाहिजे शंभर कोटी अशी नारेबाजी देखील करण्यात आली.
गृहमंत्री अनिल देशमुख एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या माध्यमातून महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करतात असा खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी केला. महिन्याकाठी शंभर कोटी रुपये वसूल करून देण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोपच त्यांनी केला आहे. हा प्रकार अत्यंत लाजिरवाणी आहे. राज्यातील मंत्री वसुलीचे काम करतात हेच यामुळे स्पष्ट होत असल्याचा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देत नाही तोपर्यंत भाजप आक्रमक राहणार असून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार मदन येरावार यांनी दिला.