यवतमाळ - तीन आठवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळल्याने बळीराजाने सुटकेचा निश्वास टाकला असून पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९११.३४ मिलिमीटर पावसाची सरासरीची नोंद झाली आहे.
मागील काही वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठली नाही. प्रत्येक वेळी ६० ते ७० टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ १७.६२ टक्के पावसाने हजेरी लावली आहे. मागील २५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. कपाशी, सोयाबीन, तूर हे पिके करपण्याची शक्यता होती. यातच शुक्रवार दुपारपासून पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहेत.