यवतमाळ -जिल्ह्यात कोरोनाबाधित आणि कोरोना मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असली तरी एकाच दिवसांत बरे होण्याचे प्रमाण आणि दिवसभरातील एकूण अहवालांपैकी निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. आज 588 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, एकाच दिवशी 5 हजार 279 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजही 17 बधितांचा मृत्यू झाल्याने मागील तीन दिवसांत 70 नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. तर, आज १ हजार ७५ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजले.
हेही वाचा -पुसदमध्ये व्हेंटिलेटर चक्क धूळखात; डॉक्टरांवर कारवाईची मागणी
5 हजार 839 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 839 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 2 हजार 692, तर गृह विलगीकरणात 3 हजार 147 रुग्ण आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40 हजार 647 झाली आहे. 24 तासांत 588 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 33 हजार 922 आहे. तर, जिल्ह्यात एकूण 886 मृत्यूंची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 11.79 असून, मृत्युदर 2.18 आहे.
खासगी कोविड रुग्णालयात 193 बेड शिल्लक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 557 बेड रुग्णांसाठी उपयोगात, तर 20 बेड शिल्लक आहेत. विशेष म्हणजे, वैद्यकीय महाविद्यालयातील 410 ऑक्सिजन बेडपैकी 340 जणांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, उर्वरीत 70 रुग्ण ऑक्सिजन बेडवर भरती असले, तरी त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा या तीन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 180 बेडपैकी 83 उपयोगात तर 97 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 28 कोविड केअर सेंटरमध्ये एकूण 2 हजार 278 बेडपैकी 1 हजार 545 उपयोगात, तर 733 शिल्लक आणि 20 खासगी कोविड रुग्णालयांत एकूण 729 बेडपैकी 536 उपयोगात, तर 193 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा -...तर कंपनीला काळ्या यादीत टाकू; खासदार भावना गवळी यांची धमकी