महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

५० लाखांसाठी अपहरण; भाजप पदाधिकाऱ्यासह ६ जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी - crime

यवतमाळ येथील एका सायकल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला असून ६ जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींसह पोलीस पथक

By

Published : Jul 16, 2019, 9:05 PM IST

यवतमाळ- येथील एका सायकल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. त्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी स्कॉड पथकाने काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी आज ६ आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर एका आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.

५० लाखांसाठी अपहरण; भाजप पदाधिकाऱ्यासह ६ जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेला शुभम तोलवाणी याच्यावर क्रिकेट सट्ट्यातून मोठे कर्ज झाले. ते चुकविण्यासाठी त्याने हर्षचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली. शुभम टोलवाणी आणि त्याचा मित्र किशन कोटवानी या दोघांनी यासाठी यवतमाळमधील सराईत गुंड निलेश उन्नरकाठ याला सुपारी दिली होती. त्यानुसार निलेशने आपल्या ३ साथीदारांसह अपहरणाचा कट रचला. हर्ष नाचवानी हा शिकवणीहून परत येत असताना रस्ता निर्मनुष्य झाल्याचे पाहून हर्षला चाकूचा धाक दाखवून दुचाकीवर बसून त्याचे अपहरण केले होते.


अपहरण केल्यानंतर हर्षला घेऊन हे दारव्हा रोडवरील इचोरी जंगलात नेले होते. तेथे हर्षला बेल्टने जबर मारहाण करण्यात आली. नंतर त्याचा व्हिडिओ बनविण्यात आला, त्यात हर्षच्या वडिलांकडे ५० लाखांची मागणी करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता हर्षला घेऊन आरोपी यवतमाळ शहरातील बोरले नगर येथे गेले होते.


घाबरलेल्या हर्षच्या वडिलांनी ताबडतोब पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळे पथके कार्यान्वीत करून तपासाची चक्रे फिरवली. शहरालगतच्या सर्व जंगल परिसरात हर्षचा शोध सुरु केला. त्याचवेळी तांत्रिक तपास पथकाने हर्षचे मोबाईल लोकेशन घेऊन त्याचा छडा लावला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज लांडगे यांना शुभमवर संशय आला. त्याला पोलीस मुख्यालयात आणून प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो पोलिसांसोबत राहून तपासाबाबत अपडेट करत होता. त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी हर्षला ठेवण्यात आलेल्या घरातून त्याची सुटका करून आरोपींना ताब्यात घेतले.


यात पोलिसांनी निलेश उन्नरकाट, नितेश राठोड, अरविंद साबळे, सतीश शेलोटकर, शुभम तोलवानी, सुरज उर्फ सपना शुक्ला या ६ जणांना अटक केली असून किशन कोटवानी याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आनंद वागतकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशराम अबोरे, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सलमान शेख, सुधीर पुसदकर, गणेश राठोड यांनी केली.

आरोपी भाजप पदाधिकारी


शुभम तोलवानी हा भाजपच्या युवा मोर्चा आणि आयटी विभागाचा पदाधिकारी आहे. यामुळे भाजप नेत्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकून तो पोलीस अधिकाऱ्याच्या जवळ राहायचा. त्याने याचाच डाव साधून हा गुन्हा केला. क्रिकेटच्या सट्ट्यामध्ये पैसे हारल्याने झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अपहरण करून तात्काळ पैसे कमविण्याच्या नादात हे आरोपीने मोठा गुन्हा केला. त्यांना न्यायालयमध्ये हजर केले असता ६ आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ABOUT THE AUTHOR

...view details