यवतमाळ- येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 182 जण भरती आहेत. यापैकी 9 जणांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. गत 24 तासांत 24 जण आयसोलेशन वॉर्डात दाखल झाले आहेत, तर रविवारी एकूण 33 जणांचे नमुने नागपूर येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.
आयसोलेशन वॉर्डात 182 जण भरती, 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 91 जण विलगीकरणात आयसोलेशन वॉर्डातील पॉझिटिव्ह असलेले 8 रुग्ण ज्या ज्या भागात फिरले होते, तेथे आरोग्य विभागाच्यावतीने रोज सर्व्हे करण्यात येत आहे. यात सावर (ता. बाभूळगाव) 790 कुटुंबातील एकूण 3510 लोकांचा सर्व्हे करण्याकरिता 16 टीम कार्यरत आहेत. बाभूळगाव येथे 1423 कुटुंबातील 6402 लोकांचा सर्व्हे आरोग्य विभागाच्या 30 टीममार्फत करण्यात येत आहे.
नेर येथे 1950 कुटुंबातील 9088 नागरिकांच्या सर्व्हेकरिता 22 टीम तैनात आहेत. तसेच शहरातील जाफर नगर, मेमन सोसायटी आणि इंदिरा नगर येथेसुध्दा नियमित सर्व्हे करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने नागरिकांना ताप, खोकला, सारीचे लक्षणे व इतर काही लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येतो. विशेष म्हणजे रँडम पद्धतीने या भागातील नागरिकांचे नमुने तपासणीकरिता नागपूर येथे रोज पाठविण्यात येत आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील ज्या नागरिकांचे नमुने चाचणीकरीता घेतले आहे, त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. एकापेक्षा जास्त लक्षणे असलेल्या व्यक्तिला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयसोलेशन वॉर्डात त्वरित दाखल करावे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नका, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आरोग्य विभागाला दिले आहे.