वाशिम - वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये आज काँग्रेसच्या वतीने आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात भर पावसात इंधन दरवाढी विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. उत्पन्न बाजार समिती येथून या मोर्च्याला सुरुवात झाली होती.
वाशिममध्ये इंधन दरवाढीविरोधात भर पावसात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा महागाईविरोधात निषेध आंदोलन
या मोर्च्यात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव विजयसिंग यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आमच्या वरिष्ठ नेत्यांचे या सरकारकडून कॉल रेकॉर्डिंग केले जात आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. सोबतच जनतेनेही रस्त्यावर उतरून या महागाईच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. दरम्यान, आज मालेगाव शहरामध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र काँग्रेसने या मोर्च्याचे नियोजन केले होते. त्यामुळे भर पावसातही हा मोर्चा काढण्यात आला.
प्रत्येक बैलगाडीमध्ये 4 ते 5 कार्यकर्ते
दरम्यान, बैलगाडी मोर्चामध्ये प्रत्येक बैलगाडीमध्ये 4 ते 5 कार्यकर्ते दिसून आले. काही दिवसांपूर्वी मुबंईतही बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी एकाच बैलगाडीमध्ये 12 ते 15 काँग्रेस कार्यकर्ते चढल्याने बैलगाडी खाली कोसळली होती. यामध्ये भाई जगताप यांच्यासह अनेक जण खाली कोसळले होते. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या सगळ्या प्रकारामुळे काँग्रेसच्या या आंदोलनावर सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र, त्या प्रकारानंतर आता कार्यकर्त्यांनी खबरदारी घेतली असावी, अशी चर्चा गावात रंगली होती.
हेही वाचा -व्हिडिओ पाहा बे पोट्टेहो! : स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, राजकारण आणि सरांची गर्लफ्रेन्ड...