वाशिम - विहीर दुर्घटनेतील मृतदेह तब्बल ६ तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मसला गावात विहीर खचून २ मजूर दबले होते. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विहीर दुर्घटनेतील मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश
विहीर दुरुस्तीचे काम सुरू असताना विहीर खचून ढिगाऱ्याखाली दबलेल्या २ मजुरांचा मृत्यू झाला आहे.
पुंडलिक धाये आणि रवी तलवारे, असे मृतांची नावे आहेत. आज सकाळी विहीर मालक बंडू थोरात यांच्या शेतात विहीर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक विहीर खचली. त्यामध्ये पुंडलिक आणि रवी हे दोन्ही मजूर मलब्याखाली दबले होते. त्यांना वाचवण्यासाठी तब्बल ६ तास प्रयत्न करण्यात आले. गेल्या ५ तासांपासून प्रशासनाच्यावतीने शोधकार्य सुरू आहे. विहिरीतील पाणी इंजिनच्या माध्यमातून बाहेर काढले. एवढेच नाहीतर जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवण्यात आला. त्यांना बाहेर काढले असता दोघेही मृत झाले होते. महसूल प्रशासन आणि गाडगेबाबा अपात्कालीन पथक यांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. यामध्ये बंडू थोरातही जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.