बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज (मंगळवारी) वेगवेगळ्या ठिकाणी 2 मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृतापैकी एकाची ओळख पटली असून प्रेमचंद सुरेशसिंग चौधरी (वय, 28 रा. ग्राम नेवला ता. ईगलास अलीगढ, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. तर दुसरा मृतदेह अनोळखी आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मलकापूर शहरातील विश्रामगृह आवारात एक अनोळखी मृतदेह असल्याची माहिती सकाळी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरु केला. त्याचवेळी नांदुरा रोडवरील उंबरनाला परिसरात आणखी एक मृतदेह असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यामधील एकाची ओळख पटली असून दुसरा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शितगृहात ठेवण्यात आला आहे.