वाशिम -मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकावर एसटी बस नेण्यास चालक टाळाटाळ करत आहेत. याच प्रकारातून गुरूवारी दोन विद्यार्थिनींना मालेगावला न उतरवता थेट वाशिमला नेल्याची घटना घडली.
मालेगाव येथून शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. मालेगाव येथील तरन्नुम खानम व सानिया खान या दोन विद्यार्थिनी गुरूवारी पातूर येथे गेल्या होत्या. सायंकाळी घरी येण्यासाठी दोघी एमएच २० बीएल ४१५० क्रमांकाच्या अकोला - पुसद बसमध्ये बसल्या. मात्र, पातूरवरून मालेगाव येथे येत असताना सदर बस बसस्थानकावर गेलीच नाही. दोघी विद्यार्थीनींनी वाहक आणि चालकाकडे मालेगाव येथे उतरवण्याची विनंती केली. मात्र, बस न थांबवता दोघींना थेट वाशिमला नेले.