वाशिम - 'सोनियाच्या ताटी उजळल्या मोती... ओवाळीते भाऊराया.. वेड्या बहिणीची वेडी ही माया...' हे गीत रक्षाबंधनाच्या दिवशी कुठल्याही बहिणीच्या कानावर पडले तर, तिला आपल्या भावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जिल्ह्यातील वसारी येथील किरण जाधव यांचे दोन्हीही भाऊ सैनिक आहेत. त्या आजही आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत आहेत. सीमेवर लढणाऱ्या माझ्या दोन्ही भावांचा मला गर्व असल्याचे किरण यांनी सांगितले. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
रक्षाबंधन : सैन्य दलातील भावांच्या आठवणीने बहिणीला अश्रू अनावर
वाशिम जिल्ह्यातील वसारी येथील किरण जाधव यांचे दोन्हीही भाऊ सैनिक आहेत. सीमेवर लढणाऱ्या माझ्या दोन्ही भावांचा मला गर्व असल्याचे किरण यांनी सांगितले.
संपूर्ण देशात बहीण-भाऊ एकत्रित येऊन रक्षाबंधन साजरे करीत असतात. मात्र, सैनिक असलेला भाऊ हजारो मैल दूर अतिशय जोखमीच्या परिस्थितीत सैन्यात आपल्या जबाबदारीवर असतो. तेव्हा त्याच्या बहिणीच्या मनात असंख्य उमाळे फोडणारा गहिवर दाटून येतो. मात्र, अशाही स्थितीत आपल्या भावाला देशासाठी समर्पित केल्याचा अभिमान बाळगत या बहिणी आपल्या वेड्या मनाची समजूत घालीत असल्याच्या भावना किरण जाधव यांनी व्यक्त केल्या.
आजवर जम्मू-काश्मीर, पठाणकोट इत्यादी ठिकाणी पोस्टिंगवर जावे लागले आहे. सुनील जाधव हा पठाणकोट येथे तर ज्ञानेश्वर जाधव सांबा येथे आपले कर्तव्य बजावत आहे. दोघे सैन्यात गेल्यापासून एकही रक्षाबंधन आतापर्यंत साजरे केले नाही. टीव्हीवर जेव्हा बहीण-भावांचे कार्यक्रम दाखविले जातात, तेव्हा प्रत्येक वेळी भावाची आठवण येते. रक्षाबंधनाला तर सकाळपासूनच भावाच्या आठवणींनी डोळे भरून येतात.