वाशीम - जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांची प्रचार रॅली झाली. या रॅलीत चौकीदार चोर है, अशा घोषणा दिल्याने राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या राड्याच्या व्हिडिओची चर्चा मुख्यमंत्र्यांच्या विजय संकल्प सभेमध्येदेखील चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली.
शिवसेनेचे उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचार रॅलीत राडा; व्हिडिओ व्हायरल - chaukidar chor hai
या रॅलीत चौकीदार चोर है अशा घोषणा देण्यात आल्या आणि राडा सुरू झाला.
मंगरूळपीर येथे शनिवारी खासदार भावना गवळी यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. भावना गवळी कारमध्ये हातात धनुष्यबाण घेऊन प्रचार करत होत्या. त्यादरम्यान या रॅलीत सेना, भाजपचे अनेक कार्यकर्ते सहभागी होते. मात्र, अचानक या रॅलीत चौकीदार चोर है अशा घोषणा देण्यात आल्या आणि राडा सुरू झाला. भावना गवळी यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले. मात्र, प्रचार रॅली टाय टाय फिस झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होती. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रॅलीतून काढता पाय घेतला.
मात्र, या रॅलीत शिवसेना व भाजप महायुतीत सोबत असल्यावरही चौकीदार चोर असल्याच्या घोषणा कोणी कशामुळे दिल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वाशिम येथे विजय संकल्प सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साडेचार वाजता आगमन झाले. त्या सभेला मंगरुळपीर येथील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दांडी मारली. तर, भाजप आमदार लखन मलिक यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सभेत मंगरूळपीर येथे झालेल्या राड्यानंतर आपली अनुपस्थिती दर्शविल्याने चांगलीच चर्चा रंगली.