वाशिम - सध्या राज्यांत नव्हे तर संपूर्ण देशात विद्यूत निर्मितीचे खूप मोठे संकट उभे राहिले आहे. अशा आणीबाणीच्या काळात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची गरज देशाला भासत आहे. यात रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या दाबातून ऊर्जानिर्मिती शक्य असल्याचा शोध वाशिम येथील संशोधक सत्यनारायण भड यांनी लावला आहे. गेल्या 12 वर्षापासून अशाच अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत.
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपासून वीजनिर्मिती; सत्यनारायण भड यांचे संशोधन - सत्यनारायण भड
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सत्यनारायण भड यांनी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या दाबातून ऊर्जानिर्मिती शक्य असल्याचा शोध लावला आहे.
महामार्गावर धावताना वाहनांचे प्रचंड वजन रस्त्यावर पडते तर वाहन निघून गेल्यावर हा भार शून्य होतो. वजनाच्या या चढ उतारातून निर्माण होणाऱ्या कंपनाने विद्युतनिर्मिती शक्य असल्याचा शोध भड यांनी लावला आहे. त्यासाठी त्यांनी जे मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलच प्रदर्शन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर प्रदर्शित करण्यात आले. भड यांचा हा प्रकल्प अंमलात आणला तर देशात एक नवीन अपारंपरिक ऊर्जा स्रोत मिळणार आहे.
सत्यनारायण भड हे शासकीय तंत्र निकेतनमधून सेवानिवृत्त झाले. त्यांनी 2009 मध्ये वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प महामार्गावर उभारण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च येणार असूनएका दिवसात 50 हजार व्याट वीजनिर्मिती होणार असल्याचे भड सांगितले.
सत्यनारायण भड यांनी केलेल्या या प्रकल्पाचे पेंटट मिळण्यासाठी त्यांना जवळपास 12 वर्ष लागले. त्यांनी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी केलेला प्रयत्न हा देशातील एकमेव वेगळ्या प्रकारचा प्रकल्प असल्याची माहिती त्यांनी दिली. या साठी लागणारी गुंतवणूक एकदाच करावी लागणार असून त्यापासून पुढे अनेक वर्षे मोफत विद्युत मिळणार असल्याने हा प्रकल्प फायद्याचा ठरणार आहे.