वाशिम -लाडेगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या प्रणव ठाकरे या तरुणाने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून 476 रॅंक घेत आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
प्रणवचे वडील शेतकरी असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. यासोबत टेलरिंगचा जोड व्यवसाय ही प्रणवचे वडील करतात प्रणवचे दहावीपर्यंतचे शिक्षण कामरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत झाले. त्यानंतर त्याने बीएससीकरिता कारंजातील विद्याभारती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाची परीक्षा देऊन त्यामध्ये उत्तीर्ण होऊन कृषी मंडळ अधिकारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कर्तव्यावर असताना आता प्रणवने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.
'त्याच्या शिक्षणासाठी आम्ही कामरगावात आलो' -
प्रणवची आई वंदना ठाकरेने यासंदर्भात बोलताना सांगितले की, प्रणव हा पहिल्या वर्गापासून तर बारावीपर्यंत परीक्षेत पहिला क्रमांकच घेत होता आणि आम्ही शेतात असल्यावर तो सायकलवर शेतात येऊन अभ्यास करायचा. आम्ही त्याला सांगायचो की तू फक्त शिक्षणाकडे लक्ष दे, तू एक दिवस मोठा अधिकारी बनशील आणि आज त्याला यश मिळाले. प्रणव हा शिक्षणात खूप हुशार होता. त्याला शिक्षणाची खूप आवड होती. तो रोज सायकलने जायचा. आम्हाला त्याच्या प्रवासाची भीती वाटायची म्हणून आम्ही खामगावला स्थायिक झालो आणि त्याचे कामरगाव येथील शिक्षण पूर्ण केले.
'कृषिमंडळ अधिकारी बनलो' -
प्रणवने यावेळी बोलताना सांगितले की, मी बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पुत्र असल्याने व शेतीची आवड असल्याने कृषी खात्यात जाण्याचे ठरविले व कृषी मंडळाधिकारी म्हणून नांदगाव खंडेश्वर येथे रुजू झालो. त्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी केली व आज या परीक्षेत ही यश संपादन केले, अशी प्रतिक्रिया प्रणवने दिली आहे.
हेही वाचा -नालासोपारातील सूर्यभान यादव यूपीएससी परीक्षेत देशात ४८८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण