वाशिम -मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील 55 वर्षीय प्रमिला देवळे यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने केलेल्या तपासात सून मुख्य सूत्रधार निघाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मालेगाव पोलिसांनी सून रेखा देवळे आणि साथीदार डिगांबर देवळे यांना अटक केली असून,न्यायालयाने त्यांना 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -युती सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती जाहीर
मालेगाव शहराजवळून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या नागपूर-मुंबई या महामार्गावरील ग्राम नागरदास येथील प्रमिलाबाई केशव देवळे या महिलेचा खून झाला असल्याची माहिती तिची सून रेखा विजय देवळे हिने 9 मार्च रोजी सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान मालेगांव पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी आपल्या लवाजम्यासह घटनास्थळ गाठून चाचपणी केली असता, सदर वृद्ध महिलेच्या गळ्याला दोरी आवळून खून करण्यात आला असल्याचे दिसून आले. व आरोपी अज्ञात असल्याने मालेगाव पोलिसांनी तपासाची तात्काळ फिरवीत श्वानपथकासह फॉरेनसीस लॅबचे पथक नागरदास येथे पाचारण केले. श्वान पथकाच्या दिशादर्शक हालचालीवरून मृतक प्रमिला केशव देवळे यांची सून रेखा विजय देवळे हिच्यावरच संशय आला. त्यावरून मालेगाव पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता रेखा विजय देवळे हिनेच आपली सासू प्रमिलाबाईचा काटा काढला असल्याचे प्राथमिक चौकशीतून दिसून आले.