वाशिम - आज जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्यापूर्वी खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलिसात खासदार भावना गवळी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर शहरातील आमदार समर्थक भाजपा कार्यकर्त्यानी पाटणी चौकात खासदार भावना गवळी यांचे पोस्टर आणि टायर जाळून निषेध केला. त्याच दरम्यान खासदार समर्थक शिवसैनिक ही घटनास्थळी झाले. यावेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजकीय वादामुळे शहरासह जिल्ह्यात एकच चर्चा-
जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्याअगोदर खासदार भावना गवळी आणि आमदार गोपिकीशन बाजोरिया यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गुंठेवारीची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू होती. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी मध्ये आले. त्यांनी मी गुंठेवारी सुरू होऊ देणार नाही, असे म्हटले. मी महिला असतांना त्यांनी हुज्जत घातली. मीही त्यांच्याविरुद्ध तक्रार करीत असल्याचे खासदार भावना गवळी म्हणाल्या. दरम्यान, सद्यस्थितीत शहरातील वातावरण निवळले असून शांतता आहे. आजच्या राजकीय वादामुळे शहरासह जिल्ह्यात एकच चर्चा रंगली होती.
हेही वाचा-'शेतकरी आंदोलन चिघळण्याला केंद्र सरकारची आडमुठी भूमिका जबाबदार'