वाशिम- रिसोड तालुक्यात यंदा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र केनवड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळवल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या अधिकाऱ्यांविरोधात वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन दखल नसल्याने सोमवारी संतप्त झालेल्या शेतकरी संघर्ष संघटना व हजारो शेतकऱ्यांच्या वतीने नागपूर-मुंबई महामार्गावर केनवड येथे रास्तारोको करण्यात आला. तब्बल एक तास झालेल्या रास्ता रोकोमुळं बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा - पीकविमा कंपनीविरोधात शिवसेना आक्रमक; वाशिममध्ये रास्ता रोको
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केनवड शाखेच्या शेकडो खातेधारक शेतकऱ्यांमध्ये कर्ज माफी संदर्भात संभ्रम आहे. या शाखेमधून अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज तसेच शेती विषयक कारणांसाठी कर्ज काढली आहेत. तसेच वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठी खाते काढले आहेत. सरकारने दिलेल्या कर्जमाफीसाठी लाभार्थी असून सुद्धा अनेकांचे खाते निल दाखवित नाहीत. तालुका उपनिबंधक कार्यालयाची यादी व बँक स्टेटमेंट यामध्ये तफावत आढळते.