वर्धा - जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील महाकाली धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या दुष्काळाने धरणातील मंदिर उघडे पडले आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेला असता पोहण्याचा मोह आवरला नसल्याने त्याने उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने त्याचा मृत्यू झाला.
गोपाल नागोसे (वय २८), असे या मृत तरुणाचे नाव आहे. महाकाली धरणातील मंदिराचा कळस दिसायला लागला तेव्हापासून आकर्षण निर्माण झाले आहे. अनेक वर्षानंतर मंदिर उघडे पडल्याने लोक छातीच्यावर पाणी असतानाही दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. त्याचप्रमाणे गोपाल शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने तो पाण्यात बुडाला.