महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बचत गटातील महिलांना उमेदच्या मदतीने जीवनोन्नती, बॅगची परदेशात विक्रीला सुरवात - export

वर्ध्यातील सिंदी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झालेल्या या व्यवसायाला जागतिक बाजारपेठ मिळू लागली आहे. इथे निर्मित होणाऱ्या खादीच्या हँड बॅग जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवू पाहत आहे.

खादी बॅग

By

Published : Mar 8, 2019, 11:11 PM IST

वर्धा- घरातली आर्थिक परिस्थिती बेताची असताना शिवणकामाच्या आवडीतून खादी बॅग निर्मितीला सुरुवात झाली. वर्ध्यातील सिंदी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झालेल्या या व्यवसायाला जागतिक बाजारपेठ मिळू लागली आहे. इथे निर्मित होणाऱ्या खादीच्या हँड बॅग जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवू पाहत आहे. जागतिक महिला दिनी त्यांची ही विशेष बातमी.

संबंधित व्हिडीओ

संगीता गायकवाड यांनी २००९ मध्ये बॅग बनविण्याचे काम बचत गटाच्या माध्यमातून सुरू केले. ७ महिला एकत्र येत 'खादी' पासून डिजायनर हँडबॅग निर्मितीला सुरूवात केली. यासाठी त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद प्रकल्पाची साथ सार्थकी लाभली. ३ हजाराचा कच्चा माल घेऊन काम सुरू केले. यातून पहिली ऑर्डर २०० बॅग बनविण्याची मिळाली.

पहिली ऑर्डर अनुभव देत आत्मविश्वास वाढवणारी

पहिला ऑर्डर हिंदी विश्व विद्यालयातील २०० बॅग बॅनविण्याचा मिळाला. पहिला अनुभव चुका सुधारत खूप काही शिकवून गेला. पैसे जवळ नसताना उधारीत कच्चा माल घेऊन काम केले. महिन्याभरात दिवस रात्र काम करत ऑर्डर पूर्ण झाली. या ऑर्डरमुळे काम करण्याचा आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल आज वर्षाला पाच लाखांच्या घरात पोहचली. यातूनच संगीता गायकवाड यांना परदेश वारी घडली.

संगीता गायकवाड यांना या कामात साथ लाभली ती करिश्मा फटींग, उषा पांडे, प्रिया धपके, गीता पटले, वनिता आधुलकर, संगीता शेंदरे यांची. संगीता यांच्या काम आणि जिद्द आणि नेतृत्व कौशल्यामुळे महिलांनी त्यांची वर्धिनीच्या अध्यक्षा म्हणून निवड केली.

परदेश वारीतून जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल

धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झालेला वर्धिनी हा महाराष्ट्रातील एकमेव संघ आहे. वर्षाला पाच लाखाची उलाढाल होत असल्याने त्यांना महाराष्ट्र साधनांच्या उमेद प्रकल्प आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सॅनफ्रान्सिस्को, न्यूयॉर्क, बोस्टन या शहरात जाऊन जागतिक बाजारपेठ आणि त्याच्या कसोट्या शिकायला मिळाल्या. फेसबुक आणि गुगलला भेट देण्याची संधी मिळाली. तिथल्या उद्योजकांना भेटून ऑनलाइन बाजरपेठ विक्री आणि ऑर्डर मिळाली. जीवनोन्नतीचे फेसबुक अकाऊंट इथेच उघडले. त्या माध्यमातून त्यांना आता ऑर्डर मिळत असल्याचेही त्या सांगतात. सुरूवातीला बाजारात गेल्यावर साड्यांवर नजर जायची. आता मात्र, नजर जाते ती वेगवेगळे रंग आणि बनावट असलेल्या बॅगांवर. हळू-हळू कामाचा उत्तम दर्जा गाठण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रिया धपके आणि करिश्मा फटिंग सांगतात.वर्ध्यातील छोट्याशा सिंधी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीतील व्यवसाय उंच भरारी घेऊ लागला. महिलांनी स्वप्न पहावे आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे संगीता गायकवाड सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details