वर्धा- कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊन असल्याने पुढे अनेकांनी लग्न पुढे ढकलली आहेत. मात्र, वर्ध्यातील दोन कुटुंबांनी तीन महिन्यांपूर्वी ठरलेलाच मुहूर्त साधला आहे. लग्नाचा विधी पार पडताना घरात राहण्याच्या, सामाजिक अंतर राखण्याचा आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देत हे लग्न झाले. त्यामुळे या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
वर्ध्याच्या सेलुसरा इथल्या दर्शन पचारे आणि देवळीच्या अंदोरी येथील पूजा नान्हे यांचे तीन महिन्यापूर्वीच लग्न ठरले होते. लग्नाची तारीख ठरली पण लॉकडाऊन झाले आणि लग्नाचे काम सर्व ठप्प झाले अखेर लग्न ठरलेल्या मुहूर्तावर करण्यासाठी आणि लग्न करताना नियम पाळले गेले पाहिजेत यासाठी गावातील पोलीस पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. अखेर चर्चेअंती सोशल डिस्टन्सिंग ठेऊन लग्न करायचे ठरले. यासाठी जागा मोठीच लागणार म्हणून गावातील प्राथमिक शाळेच्या मैदानावर लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.