वर्धा - कोरोनामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी सापडले आहेत. शेतीचा जोडधंदा असलेला व्यवसाय म्हणजे दुधाची मागणी घटल्याने आर्थिक नुकसान होत आहे. यापुढे कष्टकरी शेतकऱ्याच्या घरात दुधाचा थेंबही शिल्लक राहणार नाही. शासकीय दरात सर्व दूध विकत घेतले जाईल आणि त्याची पावडर तयार केले जाईल, असे पशुसंवर्धन तथा पालकमंत्री सुनिल केदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आरोग्य केंद्र तसेच तालुकास्तरावर आढावा बैठका घेतल्या. यासह त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा बैठक घेतली.
राज्य सरकारने संकलित दुधाची पावडर बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यात 200 कोटींची तरतूद केली असल्याचे मंत्री सुनिल केदार म्हणाले. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सांभाळणारे दूध विकत घेतले जाईल. शेतकरी उपाशी राहणार नाही, याची काळजी घेत आहोत असे केदार यांनी सांगितले.
सर्वत्र लॉकडाऊन असताना जिल्ह्यातील हातावर पोट असणारा एकही माणूस उपाशी राहू नये याचे नियोजन करावे, अशा सूचना केदार यांनी दिल्या. शिधापत्रिका असो वा नसो प्रत्येकाला धान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अधिकाऱ्यांना सूचना देत शिधापत्रिका बनवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
दूध संकलन कुठं होणार ....!
जिल्ह्यातील सर्व शासकीय डेअरी तसेच सहकारी संस्था, गोरस भंडार, दिनशॉ डेअरी, मदर डेअरी आदींच्या माध्यमातून 25 रुपये लिटर दराने दूध संकलन केले जाणार आहे. त्याचबरोबर दूध संकलन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या दूध डेअरीवर कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
काय आहेत पालकमंत्री केदार यांच्या सूचना....!
शिधापत्रिका असलेल्या अथवा तांत्रिक कारणामुळे मंजुरी नसलेल्या व्यक्तींना धान्य देण्यासाठी तात्काळ यादी तयार करणे. या काळात ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत यांच्याकडे वीज देयके भरण्यास निधी नसल्यास पाणी पुरवठा योजनेची जोडणी कापू नये. जिल्ह्यातील कृषीसेवा केंद्र सुरळीत चालावी. गॅस सिलेंडर २४ तासात घरपोच द्यावे. औषधांचा पूरेसा साठा करावा, श्रावण बाळ, संजय गांधी, आणि वृद्धापकाळ योजनेतील प्रलंबित अर्जदारांचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत. अर्जातील त्रुटी पूर्ण करून मंजूर करण्यात यावेत.
जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नसल्याबद्दल सुनिल केदार यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागाच्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक देखील त्यांनी केले. खासगी डॉक्टर रुग्णालये बंद करून बसलेले असताना आरोग्य खाते सैनिकासारखे खिंड लढवत असल्याबद्दल त्यांनी सर्वाचे कौतुकही केले. संकटकाळात पुढे आलेल्या सामाजिक संस्थांचे सुद्धा कौतुक केदार यांनी केले.