वर्धा -मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या महाजनादेश सभेत गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. येथे एका युवकाने भाजपचे सरपंच तथा बाजार समितीचे व्यापारी कैलास काकडे याच्या विरोधात मुख्यमंत्री भाषण करत असतानाच एक फलक फडकावला. यामुळे काही वेळ सभेत गोंधळ निर्माण झाला होता.
प्रशांत झाडे असे फलक फडकावणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला फलक दाखवताच ताब्यात घेतले. यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंचावरून खाली उतरत झालेला प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला.
वर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश सभेत गोंधळ, युवकाने फडकावला फलक सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील काँग्रेस विसर्जित केली. त्यामुळे ती आता केवळ नावालाच शिल्लक राहिली आहे. मला माहीत आहे, ही थोडी थोडकी काँग्रेसही आता तुम्ही शिल्लक ठेवणार नाही.
पाच वर्षांत मोठे परिवर्तन झाले, विद्युत कनेक्शन देऊन साडे चार लाख हेक्टर जमीन आम्ही सिंचनाखाली आणली. तसेच राज्यात सध्या २० हजार कोटींची कामे सुरू आहेत. मी जुन्या सरकारला विचारू इच्छितो, आमचा विदर्भाचा पैसे कुठे गेला, आम्ही कोणाचा पैसा पळवला नाही. माझा दावा आहे, महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जितका पैसा विदर्भाला मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त पैसा मागील पाच वर्षात आम्ही विदर्भाला दिला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.