वर्धा -येथील सिंदी मेघेच्या बुद्ध विहार परिसरात गुरुवारी एका कुटुंबातील तिघांसह श्वानाला विद्युत प्रवाहाचा धक्का लागला. यात आई-मुलगा आणि श्वानाचा मृत्यू झाला असून, यात मृत महिलेच्या पतीला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने ते बचावले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर, प्रवीण मेश्राम नामक युवकाने समयसुचकता पाळत धाडस दाखवल्याने एकाचा जीव वाचला. ग्रामपंचायत सदस्य दीपाली आणि मुलगा रोहित मेश्राम अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
सिंदी मेघे येथील ग्रामपंचयात सदस्य दीपाली मेश्राम यांचा 24 वर्षीय रोहित नामक मुलगा हा कपडे प्रेस करण्यासाठी बसला होता. यावेळी श्वानाची अंघोळ करून दिल्यानंतर श्वान ओरडत विचित्र वर्तवणूक करत असल्याचे लक्षात आले. यात रोहितचा त्याला स्पर्श होताच त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्याचा ओरडण्याच्या आवाजाने आई दिपाली धावली. त्यांनाही जोरदार झटका बसला. यात श्वान भुंकण्याचा आणि किंचाळल्याचे आवाज ऐकून शेजारचा प्रवीण मेश्राम नामक युवक हा सदर घराच्या दिशेने धावला. यावेळी रोहितच्या वडीलांना सुद्धा विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याचे जाणवले. त्याने लागलीच समय सुचकता दाखवत लाकडाच्या दांड्याने रोहितच्या वडीलांना वेगळे केले. त्यांनतर विद्युत मीटरपासून विद्युत प्रवाह खंडित केला. नंतर स्थानिकांच्या मदतीने या तिघांना रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. यात डॉक्टरांनी रोहित आणि त्याच्या आईचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर, रोहितच्या वडिलांवर तत्काळ उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे बोलले जात आहे.
घरात विद्युत प्रवाह कुठून आला याबद्दल अनेक तर्क वितर्क लावाले जात आहे. मात्र, विद्युत प्रवाह कपडे प्रेस करण्याचा प्रेसला आला की श्वान बांधून असलेल्या लोखंडी ग्रीलला आला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, हे दोन्ही मृत्यू विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाले असून विद्युत प्रवाह कुठून आला हे चौकशी नंतर स्पष्ट होईल. तर, सदर विद्युत प्रवाहमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. साधारणतः अशा घटनांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत अधिकारी या बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करतात. या निरीक्षणानंतरच विद्युत प्रवाहाचे नेमके कारण निष्पन्न होईल.
पावसाळ्याच्या दिवसात घराच्या भिंतींमध्ये ओलावा निर्माण होतो. तसेच यात आर्टींग कमकुवत असल्यास बऱ्याचदा विद्युत पुरवठ्यात बिघाड होण्याची शक्यता असते. यामुळे या घटनेसंदर्भात चौकशी अहवाल मागवला जाईल. तो प्राप्त झाल्यानंतर विद्युत प्रवाहाचे नेमके ठिकाण स्पष्ट होईल अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक चौधरी यांनी ईटीव्ही भारतला दिली.