वर्धा - आर्वी तालुक्याच्या सुकळी (उबार) शिवारात टेकडीवर रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वनविभागाने अखेर तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जाळी जप्त करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली.
खरांगणा (मोरांगणा) वनविभागांतर्गत येणार्या सुकळी (उबार) शिवारात टेकडीवर रानडुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तीन ते साडेतीन वर्षांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याने प्राणी मित्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वनविभागाच्या अधिकार्यांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनाही १५ जूनपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी अटक केलेल्या तिघांची नावे अजित राठोड, धनराज सोडे, संजू सोलंकी अशी तिघांचे नावे आहेत. या प्रकरणात वापरलेली जाळी जप्त करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाकडून अधिकार्यांनी जप्त केली. यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. वनविभागाकडून इतरांचा शोध सुरू आहे.
बिबट्याचा मृत्यू नेमका केव्हा झाला?
बिबट्या अडकला असल्याचे 3 वाजताच्या सुमारास आम्हाला समजले, अशी माहिती वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हन यांनी ‘ईटीव्ही भारत’ला दिली. त्यानंतर साडे तीन वाजताच्या सुमारास वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
पण नेमका बिबट्या अडकला किती वाजता? हे स्पष्ट झाले नाही. बिबट्या किती वेळ अडकून राहिला, याबद्दल काही कळू शकले नाही. बिबट्या अडकल्यानंतर साधारण मृत्यू झाला नसेलच. पण, मग गस्त घालणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळले असेल तर ते कसे, असे अनेक प्रश्न या प्रकरणाच्या भोवती आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत, अशी वन्यप्राणी मित्रांची मागणी आहे.