वर्धा- यंदा सर्वांनाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. दुष्काळामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी गावात लग्नकार्यांना ब्रेक लागला. गावात वधू वर असतानाही केवळ आर्थिक अडचणीमुळे लग्नकार्य होऊ शकत नाही. त्यामुळे समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ गावातील नागरिकांनी नामी शक्कल लढवली आहे. गावकऱ्यांनी चक्क पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात बाहुला-बाहुलीचे लग्न लावून दिल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनत आहे.
शिवनफळ गावात 22 युवक-युवती लग्नाचे आहेत. पण दुष्काळाने अर्थकारण बिघडल्याने गावात लग्न सोहळा झाला नाही. कारण शेतकऱ्यांना यावर्षी उत्पन्नच झाल नाही. त्यामुळे घरच्या लग्न कार्यांना थांबा दिला. मागील अनेक वर्षांत प्रथमच असा अनुभव गावकऱयांना आला. गावात किमान एक तरी लग्न व्हायलाच पाहिजे म्हणून मग बाहुला-बाहुलीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. त्याकरिता लोकवर्गणी गोळा केली. आणि सामूहिक एकोप्यातून कौटुंबीक रितीरिवाजानुसार लग्नसोहळा पार पडला. यावेळी यंदा भरपूर पाऊस होऊ दे आणि धनधान्य पिकू दे तसेच बळीराजाची परिस्थिती सुधारून सर्व मंगलमय होऊ दे असे, देवाकडे साकडे देखील घालण्यात आले.