वर्धा- जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या उमरविहिरी येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांनी आपल्या कुटुंबासह नवीन विक्रम नोंदवला. एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर अवघ्या ४ तास ३१ मिनिटांत पार करून त्यांनी एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद करण्यात त्यांना यश आले आहे. असा विक्रम करणारे आशिया खंडातील धुर्वे हे एकमेव कुटुंब ठरले असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी या विक्रमाची नोंद करण्यात आली.
सुखदेव धुर्वे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा तहसीलच्या उमर विहिरी या गावचे आहे. ते सध्या नागपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी तैराक म्हणून ओळख मिळवली आहे. या उपक्रमाची नोंद घेण्याकरिता एशियन बुक ऑफ रेकॉर्डचे डॉक्टर संदीप सिंग, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर, निल लबडे, माजी उपजिल्हाधिकारी तथा स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे, मुंबईचे डीआयजी कृष्णप्रकाश आदी मान्यवर या विक्रमाची नोंद होताना उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे कुटुंबाची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद धुर्वे कुटुंबीयांनी एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या साहसी उपक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी एलिफंटा येथून सुरुवात केली. साखळी पद्धतीने विक्रम नोंदविला जाणार होता. यामुळे सर्वप्रथम सार्थक धुर्वे यांनी समुद्रात उडी घेत खाऱ्या पाण्याच्या लाटेत आपला प्रवास सुरू केला. प्रति मिनिट ८० आर्मसच्या गतीने तो समुद्राच्या लाटांना चिरत पुढे सरकत होता. चार किलोमीटर अंतरावर आंतरराष्ट्रीय जलतरण नागपूर पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव धुर्वे यांनी समुद्रात उडी घेतली. १०० आर्मसच्या प्रति मिनिट या गतीने त्यांनी गेटवेकडे कूच केला. ९ किलोमीटर अंतरावर त्यांची पत्नी वैशाली धुर्वे यांनी समुद्रात उडी घेत विक्रमला जोड दिली. प्रतिमिनिट ६० आर्मसच्या गतीने त्या पोहत होत्या. ११ किलोमीटर अंतरावर ९ वर्षांच्या तन्वीनेसुद्धा सागरात उडी घेऊन खाऱ्या पाण्याचा विपरीत परिस्थितीत ६० आर्मस प्रति मिनिट गतीने पोहत अंतर कापले. यावेळी तिच्या मदतीला स्पेस स्वीमर म्हणून प्राप्ती बावनकरने तिला साथ दिली.
सुखदेव धुर्वे यांनी १२ वाजून २५ मिनिटांनी गेटवे ऑफ इंडियाचा किनारा गाठला. गेटवे ऑफ इंडियावर त्यांच्या कुटुंबीयांचे जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिकच्या क्रीडा उपसंचालकांनी कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. तसेच नागपूर जलतरण संघटनेचे सचिव डॉक्टर संभाजी भोसले यांनी अभिनंदन केले. स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, मिहीर सेन स्विमिंग स्पोर्टिंग क्लब, विक्टोरियस शार्क क्लब, डॉल्फिन स्विमिंग क्लब, कामगार कल्याण आणि नागपूर शहर पोलिसांच्या सहकार्याने हा विक्रम धुर्वे कुटुंबीयांना नोंदवता आला.