वर्धा - गेल्या काही काळात विद्यार्थी केवळ कमी गुण मिळाल्याने कठोर पाऊले उचलताना दिसून येत आहेत. देवळी तालुक्यातील अडेगाव येथील एका विद्यार्थिनीने इयत्ता बारावीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरात कोणी नसताना साडीने गळफास घेऊन मुलीने आत्महत्या केली आहे. पूजा भिसे, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
वडिलांनी आणले पेढे, पण समाधानकारक गुण न मिळाल्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
गेल्या काही काळात विद्यार्थी केवळ कमी गुण मिळाल्याने कठोर पाऊले उचलताना दिसून येत आहेत. देवळी तालुक्यातील अडेगाव येथील एका विद्यार्थिनीने इयत्ता बारावीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पूजा ही देवळीच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. मंगळवारी बारावीचा ऑनलाईन निकाल असल्याने तिला निकालाची उत्सुकता होती. मात्र, ऑनलाईन निकाल बघितल्यानंतर 55 टक्के गुण मिळाल्याने पूजाने आत्महत्या केली. तिला कोणतीही शिकवणी न लावता 55 टक्के गुण मिळाले होते. मुलगी पास झाली म्हणून तिचे कौतुक करण्यासाठी वडिल विजय भिसे पेढे घेऊन घरी आले होते. मात्र, त्यावेळी त्यांना पूजाने आत्महत्या केल्याचे समजले.
पूजा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने केलेल्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शालेय जीवनातील गुण, यश-अपयश हा आयुष्याच्या परीक्षेचा निकाल नाही. त्यामुळे कोणतेही टोकाचे निर्णय घेताना आपले आई- वडील कुटुंबीय यांचा विचार करावा. त्याबरोबरच पालकांनीसुद्धा पाल्यांना विश्वासात घेऊन समजून घेण्याची गरज असल्याचे पूजाच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.