वर्धा- महात्मा गांधीजींच्या नावाने जागतिक स्तरावर ओळख मिळालेल्या जिल्ह्यात सण १९७५ पासून दारू बंदी आहे. यात दारूवर अंकुश लावण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते. पण, पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आदेशानंतर सक्रिय झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या इतिहासतील सर्वात मोठा दारूसाठा जप्त केला आहे. कारंजा टोलनाक्यावरून संशयित ट्रकच्या तपासणी दरम्यान ६३ लाख रूपयांच्या बाराशे पेट्यांसह ट्रक, असा एकूण ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतूक होत आहे.
वर्धा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागपूरमार्गे दारू जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यासाठी कारंजा येथील टोलनाक्यावर नजर ठेवून असताना एका ट्रकवर पोलिसांना संशय आला. ट्रकमध्ये भुसा असल्याचे सांगण्यात आले. पण, ट्रकचे चाक दबलेला असल्याने नक्कीच वजन जास्त असल्याचा संशयावरून गाडीची पाहणी करण्यात आली. यात उघडपणे भुसा दिसत होता. मात्र, काही पोते हटवत पाहणी करण्यात आली. यावेळी यात दारूच्या पेट्या आढळून आल्या. एक दोन नव्हे तर चक्क १२०० पेट्या विदेशी दारू भुस्याच्या पोत्याआड लपविण्यात आली होती.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या हाती मोठा दारुसाठा लागला. पण, हा दारूचा माल हरियाणा, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीसाठी होता. परंतु, भुसा असल्याचे भासवून अमरावतीच्या अलीकडे हा साठा जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या चौकशीत पुढे आले. नेमकी ही दारू कोणाच्या मालकीची आहे आणि कुठून आली याचा शोध घेण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर आहे.
यातील हा दारुसाठा हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश या २ राज्यात विक्रीसाठी असल्याचे पॅकिंगवर लिखित आहे. यामुळे हा माल दारूबंदी जिल्ह्यात आणून अवैधरित्या विक्री केला जाणार होता की अजून कुठे याचा नेणार होते, याचा शोध घेणे गरजेचे आहे.