वर्धा- महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारतर्फे कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. 24 फेब्रुवारीला प्राथमिक 68 ग्रामपंचायतमध्ये पहिली यादी जाहीर करत प्रायोगिक तत्त्वावर यादी जाहीर झाली. यात आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करत आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 61 हजार 84 शेतकरी लाभार्थी असणार आहे. पण, अद्यापही योजनेतील लाभासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या आधार अपडेट नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शिवाय यातील मृत व्यक्तींबाबत काय पाऊले उचलले जातील हे स्पष्ट नाही.
वर्धा जिल्ह्यातील पहिल्या यादीत 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 5 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत देवळी तालुक्यातील लोणी आणि कारंजा तालुक्यातील येणगाव या 2 गावांतील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित 12 पैकी 8 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्याने तर चार शेतकरी मृत असल्याचे पुढे आल्याने सध्या लाभापासून वंचित आहेत. याबद्दल वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचे उपनिबंधक गौतम वालदे यांनी सांगितले. यात 8 जणांचे आधार प्रमाणीकरण न झालेले शेतकरी आधार नंबर बँक अपलोड करेल किंवा कोण याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.