वर्धा - राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर तो ठगांचा पक्ष आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांचा कुटनीतीमध्ये कोणीही हात धरू शकणार नाही. त्यांनी लोकसभेला कुटनीती वापरून पहिली पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी बोचरी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना केली.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ईटीव्हीशी बातचीत केली सदाभाऊ खोत हे वर्ध्यातील क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमाला आले होते. सदाभाऊंनी कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील पूरपरस्थिती वरुन सुरू असलेल्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली.
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. कोल्हापूरला सर्वाधिक तडाखा बसला आहे. या पुराने आपल्याला शिकवण दिली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे नेते मुंबईत बसलेल्या सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय, असा खोचक प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केली. राष्ट्रवादी अशा पद्धतीने टीका करत आहे, जणू सरकारनेच पाऊस पाडला असून त्याचे रिमोट कंट्रोल सरकारच्या हातात आहे. पूर हे संकट नसून निवडणुकीपुढे आलेली संधी मानून ही मंडळी काम करत आहे. या पुराचे असे राजकारण करायला नको होते. सरकार जनतेच्या पाठीशी असून त्यांना मदत द्यायचा प्रयत्न करत आहे.
संपूर्ण महाराष्ट्र हा पूरग्रस्तांच्या पाठीशी उभा आहे. भविष्यकाळात सर्वांच्या घरावर सोन्याची कवेलू आली पाहिजे, असे बोलायला पण शरद पवार मागे पुढे पाहणार नाही. 2005 मध्ये पूर आला तेव्हा काय केले होते. ते एकदा जाहीर करा मग समजेल काय दिवे लावले होते. यांना पूरग्रस्तांचे काही पडले नाही. ज्यावेळी पूर आला तेव्हा पाण्यात उतरले असते, चार दोन बोटी घेऊन आले असते तर स्वागत केले असते. लोकांचे अश्रू पुसायचा त्यांचा कार्यक्रम नाही. लोकांची मन भडकवून सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचे काम राष्ट्रवादीवाले करत आहेत. शेतकऱ्यांचा पुळका आहे तर मावळमध्ये आलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार का केला, तेव्हा कुठे प्रेम गेलं होत, असा प्रश्नही खोत त्यांनी उपस्थित केला.
पुराचं राजकारण करू नये. हे संकट निसर्ग निर्मित आहे. भविष्यकाळात असे संकट आल्यास सक्षमपणे तोंड देण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोरडी सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले. 2005 मध्ये त्यांच्याच काळात पूर आला असता पर्यायी व्यवस्थेवर काम का केले नाही. मागील 15 वर्षात काहीच केले नाही. मदत करायची असेल तर जनावरांना चारा पोहचवा. एक-दोन गावे दत्तक घ्या, गावे उभी करण्याची कामे करा. 2005 मध्ये त्यांचे सरकार असताना किती मदत दिली याचे आकडे त्यांनी जाहीर करावे. आम्ही मदत वाढवली आहे. पण मदत न करता विभागात फिरायचे, भाषण द्यायची आणि मुलाखती देत फिरत आहे. पुढील आमदारकीच्या जागा कशा वाढतील, या दृष्टीने राष्ट्रवादीवाले काम करत आहेत.
पवार साहेब सध्या तळ ठोकून बसलेत, मी त्यांचे अभिनंदन करतो. पण असे अनेक शेतकऱ्यांचे लढे महाराष्ट्रात झाले. त्यावेळी लाठ्या चालत होत्या, बंदुकीच्या गोळ्या चालत होत्या. त्यावेळी तुम्ही तळ मांडून बसला नव्हता. ऊस आंदोलनात लोक मेली. त्यावेळी त्यांच्या घरी का गेला नाहीत? त्यावेळी यांना सुभेदाऱ्या जपायचा होत्या. राष्ट्रवादी हा पक्ष नसून ठगांची टोळी आहे. वेग-वेगळ्या सुभेदाराने मिळून बनलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आहे. त्यामुळे आम्ही जे काम करतोय त्यात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यांनी जर सहभाग नोंदवला तर हे पूरपरिस्थिती निवारण्याचे काम सोपे जाईल, असे म्हणत राष्ट्रवादीवर चांगलीच बोचरी टीका त्यांनी केली आहे.
भविष्यकाळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करायला पाहिजे, या दृष्टीनेही शासनाला नियोजन करावे लागणार आहे. 56 फुटापर्यंत पाणी आले, त्यामुळे या उंचीपर्यंत पाणी आल्यास किती गाव पाण्याखाली जातात, याचा आराखडा तयार करावा लागणार आहे. लोकांना बाहेर पडण्याचे पर्यायी मार्ग तयार करावे लागणार आहे. मोठ्या संख्येतील लोक बोटीच्या माध्यमातून स्थलांतरीत करणे अशक्य होते. त्यामुळे पर्यायी मार्ग निर्माण करावे लागतील. पुलांच्या उंची वाढवाव्या लागतील अशा पद्धतीने कामाचे नियोजन केल्या जाणार असल्याचेही सदाभाऊ खोत म्हणाले.
शेतकरी, शेतमजूर यांना तातडीने 15 हजार, ग्रामीण भागात स्वयंअर्थसहाय्य म्हणून 10 हजार तसेच 5 हजार रुपये रोखीने देत आहे. 1000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतला 50 हजार, 1000 वर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतला 1 लाख रुपये स्वच्छतेसाठी देण्यात येत आहे. पूर्वीच्या काळापेक्षा मदत वाढविली आहे. मृत्यू झालेल्या जनावरांसाठी 30 हजार, मर्यादा चार जनावरपर्यंत मदत देत आहे. घरांसाठी तातडीने एक लाख, पानपट्टीधारक इतरांना 50 हजार रुपये देत आहोत, असे सांगत राष्ट्रवादी राजकारणाचा फार्स करत आहे, इथे राजकारण करू नये, हा मदतीचा काळ आहे, असेही खोत म्हणाले.