वर्धा - शहरात गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी परदाफाश केला आहे. घरात कुणी नसल्याचे पाहून हे चोरटे घरफोडी करत होते. एवढेच नाही, तर पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारच्या घरातही चोरी करत या चोरट्यांनी पोलिसांना आव्हन दिले होते.
वर्ध्यातील पोलीस अधीक्षक कार्यलया शेजारी राहणाऱ्या सुनील उमरे यांच्या घरात चोरट्यांनी घरात कुणी नसतांना हात साफ केला होता. यासह शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणावर घरफोडी करत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यात पोलिसानी पाळत ठेवत काही संशयितांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच या चोरट्यांनी पाच घरफोडयांची कबुली दिली.
यात नालवाडी येथील बबन चातूरकर, गणेशनगरचे अनुराग बंसल, पोलीस अधीक्षक कार्यलय परिसरातील सुनिल उमरे यांच्यासह भीमनगरचे श्रीरंग वाघमारे, हरिहर नगरचे रुपराव हरगुडे, धंतोली परिसरातील आशिष गाथे, आदी सात चोऱ्याची कबुली या टोळीतील चोरट्यानी दिली.
घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांचा पर्दाफाश; चौघांना अटक, तीन जण फरार पाहिले रेकी, मग घरफोडी -
वर्ध्यात हे चोरटे टोळीने काम करत होते. प्रत्येकाला काम ठरवून दिले जात होते. घरात कोणी नसल्याचे पाहून त्या घरावर सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही वेळ रेकी करत नजर ठेवली जात. सायंकाळी 9 वाजेनंतर घरात कोणी नसल्यास त्या घरात चोरीचा बेत फिक्स केला जात असे. यात मध्यरात्री घरफोडी केली जाई. यावेळी काही जण घराच्या आजूबाजूला नजर ठेवत असत.
रामा किसन देऊळकर, किसना रमेश राऊत, राजू रामा दांडेकर, मंगेश बाबुलाल गुंजेवार, अशी अट्टल चोरट्याची नावे आहेत. हे सर्व सावंगी मेघे परिसरातील टेकडीवरील एका झोपडपट्टीतील रहिवासी असून त्यांनी सात घरांतून मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातील तिघे फरार झाले असून शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पोलिसानी या चोरट्यांकडून 21 ग्रॅम सोन, 110 ग्रॅम चांदी, तसेच काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.