वर्धा - रंगोत्सवादिवशीच अवकाळी पाऊस कोसळल्याने गहू, हरभरा, कापूस यांसारख्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. रंगपंचमीच्या दिवशी वादळासह अवकाळी पावसाने अक्षरश: शिमगाच केला. ऐन सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अवकाळी पावसामुळे हिरावल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
रंगोत्सवाच्या दिवशी अचानक आभाळ दाटून आले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या काही वेळातच निसर्गाने रौद्ररुप धारण करत तांडव सुरू केला. रंगून जाण्याच्या दिवशी आकाशातील काळोख आला आणि शेतकऱ्यांसह काहींचे घरातील वातावरण बेरंग करून गेला आहे. गहू, हरभरा, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वर्ध्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, आर्थिक मदत मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी हेही वाचा -शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, किसान अभियानचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
समुद्रपूर तालुक्यातील राजापूर नांदपूर देरडा गावातील जवळपास 100 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. तेच हिंगणघाट तालुक्यासह 140 हेक्टर तर वर्धा तालुक्यात 1400 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान वर्धा तालुक्यातील तीन मंडळात झाले आहे.
32 गावच्या शेतशिवारात शिमग्याच्या पूर्वीपर्यंत चणा सवंगण्याची लगबग सुरू होती. गहू काढायला आला होता. भाजीपाला तोडून बाजारात न्यायचा होता. पण, धुळवडीच्या दिवशी अर्धा तास आलेल्या वादळाने शेतशिवार उद्ध्वस्त केला. हिरवेगार दिसणारे शितशिवार बेरंग करून टाकले. निसर्गाच्या प्रकोपात हातातोंडाशी आलेला घासच हिरावणारा ठरला आहे.
अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान हेही वाचा -कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर, 3 हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेट बाकी
वायगावमध्येही वादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब कोसळल्यामुले विद्युत तारा तुटल्या आहेत. यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला आहे. काही घरांच्या भिंती पडल्या आहे. घरातील अन्न धान्य भिजले आहे. आता पुढे काय करायचे, असा हा प्रश्न अवकाळी पावसात उध्वस्त झालेल्या कुटुंबापुढे उभा राहिला आहे.
जिल्ह्यातील तीन तालुक्यात 32 पेक्षा जास्त गावात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजात सुमारे 1600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले असल्याचा अंदाज पुढे येत आहे. 60 ते 70 घरांची पडझड झाली असल्याचेही पुढे आले आहे. लवकरच पंचनामा करून याबद्दल अहवाल पाठवत मदतीची रक्कमेची मागणी करणार असल्याचे तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी सांगितले.
आर्थिक मदत मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची शासनाने हाक ऐकून योग्य वेळेतच मदतीचा हात देऊन धीर द्यावा अशी आशा करुया.