वर्धा- लोकसभेच्या वर्धा मतदार संघात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जस-जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तस-तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील इतिहास पाहता गांधीजींच्या आणि भूदान प्रणेते विनोबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा म्हणून देशभरात ओळखला जातो. अनेक वर्ष इथे काँग्रेसने सत्ता गाजवली आहे. मात्र, काँग्रेसची अवस्था सध्या खिळखिळी झाल्याने या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे.
काँग्रेसचा गड भाजपच्या ताब्यात कसा गेला हे पाहण्यासाठी भूतकाळात डोकावे लागते. विशेष करून 2014 च्या निवडणुकीनंतर देशात आणि राज्यात जे निकाल आले, त्यामध्ये वर्ध्याचेही राजकारण बदलत गेले. गत निवडणुकीत काँग्रेसने प्रायमरी लावून लोकसभेचा उमेदवार निवडला होता. दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांनी यावेळीच्या काँग्रेसच्या उमेदवार चारुलता राव टोकसचा पराभव करत लोकसभेची उमेदवारी मिळवली. यात भाजपकडून दत्ता मेघे यांचे राजकीय शिष्य रामदास तडस हे उभे होते. रामदास तडस हे डमी उमेदवार म्हणून संबोधल्या गेले. पण मोदी लाटेत २ लाख १५ हजार ७८३ मतांनी मतांनी विजयी झाले. भाजपचे रामदास तडस ५,३७,५१८ मते मिळाली तर काँग्रेसचे सागर मेघे यांना ३,२१,७३५ मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर बसपाच्या चेतन पेंदाम यांना ९०,८६६ मते मिळाली होती.
यानंतर सत्ता परिवर्तन होताच दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभेत काँग्रेसचे दोन आमदार देवळी मतदार संघातून चारुलता राव टोकसचे भाऊ रणजित कांबळे आणि अमर काळे, वीरेंद्र जगताप हे निवडून आले. राष्ट्रवादीचे आमदार पराभूत झाले. त्याठिकाणी भाजपचे पंकज भोयर आणि समीर कुणावार, अनिल बोंडे हे निवडून आले. हळू हळू जिल्ह्यात अनके जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायतीवर भाजप पक्ष वरचढ होत गेला.
जिल्ह्यात कुणबी तेली या दोन जातींचे अधिक मते आहे. त्यामुळे उमेदवार देताना राजकीय पक्षाकडून ही बाब सांभाळल्या जाते. मुख्य लढत जातीय समिकरणातून आहेच. भाजपचे रामदास तडस हे तैलिक संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. चारुलता या दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या असून त्या कुणबी जातीतून येतात. जिल्ह्यात मागील काही दिवसात जातीय समिकरणात राजकीय ठिणगी पडल्याने याचा परिणाम दोन्ही उमेदवारांच्या मतदानावर पडू शकतो. पण जातीय ध्रुवीकरण हे केवळ राजकीय निवडणूकीपुरते मर्यादित आहे. येथील मतदारांवर गांधीजींच्या विचारांचा पगडा असून येथील सामाजिक स्थिती शेतीवर आधारित आहे.
जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. तर आता शेतकऱ्यांची आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून नवीन ओळख पुढे येत आहे. जिल्ह्यात मोठे उद्योगांचा अभाव असल्याने रोजगार मिळवण्यासाठी येथील युवकांना पुणे- मुंबई- औरगाबाद सारख्या औद्योगिक वसाहतींच्या शहरात स्थलांतर करावे लागत आहे. शेतीची अवस्थाही दयनीय आहे. सिंचनाचा मोठा प्रकल्प म्हणून निम्न वर्धाकडे पाहिले जाते. मात्र,पाठ बंधाऱ्याची कामेच झाली नसल्याने जमिनी ओलीताखाली आल्या नाहीत. सिंचनाचे या रखडेलल्या प्रश्नांकडे राजकीय नेतृत्व दृर्लक्ष करताना दिसून येत आहे. अशातच प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तर जिल्ह्यात असणाऱ्या विपूल वनसंपदेमुळे वन्य-जीवांचे अस्तीत्व मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यामुळे ही समस्यादेखील जटिल झाली आहे. या सर्व मुद्यावर वर्ध्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजपकडे ३-३ विधानसभा मतदारसंघ