वर्धा- समुद्रपूर तालूक्यातील उमरी (कुर्ला) येथे कामानिमित्त आलेल्या एका पोलीस कर्मचाऱयाचा उष्मघाताने मृत्यू झला. बाळकृष्ण इवनाथे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस स्टेशनला कार्यरत होते.
बाळकृष्ण इवनाथे हे नागपूर जिल्ह्यातील बेला येथून कामानिमित्त दुचाकीने वर्ध्याला येत होते. यावेळी त्यांना रखरखत्या उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी दुचाकी थांबवत झाडाचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा तेथेच मृत्यू झाला.
ही घटना उमरी कुर्ला बसथांब्याजवळ घडल्याने बसस्थानाकावरील काहींना व्यक्ती झोपून असल्याचे पाहून शंका आली. यावेळी जवळ जाऊन पहिले असता मृत्यू झाल्याच्या संशयाने समुद्रपूर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारावर पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पोलीसांनी व्यक्तीची पाहणी केली. तपासानंतर काही कागदपत्रांच्या आधारे मृतक इसमाचे नाव बाळकृष्ण इवनाथे असल्याचे पुढे आले. त्यांनतर मृतक पोलीस शिपाई आसल्याचे कळताच तो कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. मृतदेह शव विच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर प्राथमिक अंदाजानुसार हा उष्मघाताचा बळी ठरल्याचे समजते.
यावर्षी तब्बल आठ जणांचा उष्माघाताने मृत्यू -
उष्णतेचा प्रकोप थांबण्याचे नाव दिसत नाही. मोठ्या प्रमाणात तापमान वाढले असतांना बाहेर जाण्याचे टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच काम पडल्यास काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना जिल्ह्यात ८ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिकरित्या दिसून येत आहे. वाढते तापमान पाहता जिल्ह्यात अतिउष्ण तापमान राहण्याची शक्यता असल्याने 11 जूनपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे.