वर्धा - सेवाग्राम रुग्णालयात पिंपरी येथील नवविवाहित व्यक्तीचे प्रताप थांबायचे नावच घेत नाही. अगोदरच नियमांची पायमल्ली करून विवाह सोहळा पार पडला. हे कमी म्हणून की काय नवरदेव मुलाने रुग्णालयामध्ये उपचार घेताना नवीन प्रताप करून ठेवला आहे. उपचार घेताना सेवाग्राम रुग्णालयाच्या कोविड वार्डातील व्हिडिओ व्हायरल करत बदनामी केल्याने नवरदेव मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीच नियमांची पायमल्ली करून विवाह समारंभ पार पडल्यामुळे रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करत 25 हजाराचा दंड ठोठावण्यात आला होता.
एऱ्हवी लग्न आनंदाचा क्षण पण वर्धेकरांसाठी डोके दुः खी ठरला आहे. यात एका मागून एक रुग्ण पाहता 8 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे 6 कंटेनमेंट झोन वाढले. पिपारी मेघे सहा दिवस तर वर्ध्यासह 8 ग्रामपंचायतींना तीन दिवस संचारबंदीत राहावे लागले.
ज्या सेवाग्राम कस्तुरबा रुग्णालयात या नवरदेवासह त्याच्या कुटुंबीयांना ठेवण्यात आले. तिथे उपचार घेऊन नवरदेव कोरोनामुक्त झाला. त्यांचे आभार मानने सोडून उलट त्यांची बदनामी केली असल्याचा आरोप आरोग्य प्रशासनाने केला आहे. सेवाग्राम रुग्णालयातील कोविड वार्डमध्ये व्हिडिओग्राफीला मनाई असताना, तिथले व्हिडिओ काढून रुग्णालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश कलंत्री यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली. यावर सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचण पांडे यांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती ‘ईटीव्ही भारत’ला दिली.