वर्धा - यंदा वरुणराजा कोपला असल्याची काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा ओलांडून गेल्यानंतरही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी फटका बसू लागला आहे. यामुळे वरुणदेवाला होम-हवन करुन साकडे घातले जात आहे. शहरातील आर्वी नाका चौकातील माँ दुर्गा पूजा उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी या होम-हवनचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाने दांडी मारल्याने मागीलवर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यातच यंदाचा पाऊस सरासरीच्या तुलनेत तब्बल 200 मिलिमीटर कमी झाला आहे. त्यामुळे आधीच कोरडे पडलेले धरण, आता त्यातील मृतसाठासुद्धा संपलेला असल्याने पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या उद्भवलेली आहे. धाम नदी प्रकल्पातही शुन्य पाणीसाठा असून मृत जलसाठ्याचाही उपसा झाल्याने पिण्याचा पाण्याचे संकट वर्धा शहरावर घोंगावत आहे.