वर्धा- बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे रुग्णालयांमधील गर्दी वाढत आहे. ताप, खोकला, डायरिया अशा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांची संख्या अधिक आहे. जिल्हा रुग्णालय असो वा खासगी रुग्णालये, सगळीकडेच रुग्णांची गर्दी पहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयातील बाराशे रुग्णांची ओपीडी तब्बल सतराशेच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये साथीचे आजार झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
साथीच्या आजारांनी डोकं वर काढायला सुरवात केल्यामुळे रुग्णालयांमधील गर्दी वाढत आहे. रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांची संख्या अधिक आहे.
जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच आर्वी आणि हिंगणघाट येथे दोन उपजिल्हा रुग्णालये आहेत. यासह, जिल्ह्यामध्ये आठ ग्रामीण रुग्णालये आहेत. या सर्व ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांना विशेष सूचना देण्यात आल्या असून पुरेसा औषधसाठा देण्यात आला आहे.
साथीच्या आजारांचा संसर्ग हा सहसा पाण्यातून होतो. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून पिणे, पाणी साठवून ठेवण्याच्या जागा वेळोवेळी स्वच्छ करणे अशी खबरदारी आपण घ्यायला हवी.
पावसाळी वातावरणात ताप, सर्दी आणि खोकल्यासह इतर संसर्गजन्य आजारांची लागण अनेकांना होते. यातच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना तापाचा प्रादुर्भाव तत्काळ होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. साथीच्या आजारांमध्ये आवश्यक काळजी घेत उपचार घ्यावे, आजार अंगावर काढू नये.
परिसरातील अस्वच्छता हे प्रामुख्याने आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतात. घराप्रमाणे इतर परिसर स्वच्छ ठेवल्यास अशा आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.