वर्धा - इसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून तिहार तुरुंगातील एका आरोपीच्या पत्नीला आणि तिच्या आईला सेवाग्राम जवळील म्हसाळा येथून एनआयएने शनिवारी पहाटे ताब्यात घेतले होते. इसिस संघटनेशी संबंध असलेल्या २०१६ च्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे पथक वर्ध्यात दाखल झाले होते. ३६ तासानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक या दोन महिलांची चौकशी करून रवाना झाले आहे. ही चौकशी तब्बल 13 तास चालली. यानंतर महिला आणि मुलीला पथकाने सोडले आहे.
काय आहे प्रकरण?
२०१६ पासून अब्दुल बाशीद नामक व्यक्ती तिहार कारागृहात बंदी आहे. तो इसिस या दहशतवादी संघटनेचा हस्तक असल्याच्या आरोपाखाली त्याची चौकशी सुरू आहे. त्याची दुसरी पत्नी ही वर्ध्यातील म्हसाळा येथील एका कुटुंबातील आहे. ती शनिवारी (ता. २०) पहाटे म्हसाळा येथे भय्याजी ढाले यांच्याकडे किरायाने राहत असलेल्या आईच्या घरी हैदराबाद येथून आली होती.
तपास यंत्रणा अगोदर पासूनच तिच्या मागावर होती. ती म्हसाळा येथे पोहचताच तिच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापा टाकला. शनिवारीच हैदराबाद येथे सुद्धा तीन ठिकाणी छापे मारी सुरू झाली. यावेळी घरात झडती घेऊन इलेट्रॉनिक वस्तू ताब्यात घेत महिला आणि तिच्या आईला सेवाग्राम पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. दिवसभर विचारपूरस करत सायंकाळी वाजता दोघींना सोडून देण्यात आले.
रविवारी (ता.२१) सुद्धा हाच घटनाक्रम पुन्हा सुरू झाला. महिला आईसोबत सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात पोहचली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिवसभर विचारपूस करत कागदपत्रावर त्यांचे बयान नोंदवून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तपास यंत्रणेला यातून काही ठोस हाती लागले नसल्याचे बोलले जात आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास महिला आणि तिच्या आईला पोलिसांनी सोडून दिल्याने अद्याप ठोस काही माहिती मिळाली नसून नेहमीची चौकशी असल्याची चर्चा आहे. त्यांनतर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी निघून गेले अशी माहिती पुढे आली. मात्र, तपास सुरू आहे, असाही सूर जाता जाता अधिकाऱ्यांच्या तोंडून बाहेर पडताना दिसला.
अब्दुल बाशीदचा आणि महिलेचे संबंध
म्हसाळा येथील प्रबुद्ध नगरमध्ये ढाले यांचा घरी मागील दोन वर्षांपासून एक महिला भाड्याने राहत होती. या महिलेला ६ मुली असून यातील एक म्हणजे अब्दुल बाशीद याची दुसरी पत्नी आहे. मैमुना हिने अब्दुलशी दीड वर्षांपूर्वी विवाह केल्याचे बोलले जात आहे. अब्दुल सोबत मैमुना लग्नानंतर काही दिवस हैदराबाद येथे वास्तव्यात राहली. ऑगस्ट 2018 मध्ये त्याला अटक झाली.
बाशीद इसिसचा हस्तक?
अब्दुल हा युवकांचे मनपरिवर्तन करून त्यांन इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी काम करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो अबू धाबीमध्ये असताना २०१६ मध्ये एका प्रकरणात त्याला अटक झाल्याचे माहिती समोर आली आहे. यामुळे विवाहानंतर मैमुना हीचा इसिसशी काही संबंध आला का हेच जाणून घेण्यासाठी चौकशी एनआयने चौकशी केली असण्याची शक्यता आहे.
या तपासात कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही दिवस तपास यंत्रणेने या महिलेला ऑटोने बोलावले. चौकशीत काय निष्पण्ण झाले हे समजू शकले नसले तरी महिलेचा इसिसशी संबंध असल्याचा ठोस पुरावा हाती लागला नसल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.