वर्धा - लॉकडाऊन काळात पुण्याहून पायी निघालेले झारखंडचे 16 मजूर हे वर्ध्यात पोहचले. दरम्यान, एकाची प्रकृती खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संशयित म्हणून त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व 16 मजुरांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. कोणीही बाधित नसल्याने त्यांना हावडाला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनने नागपूरवरून झारखंड करता रवाना करण्यात आले. तर, मृत्यू झालेल्या मजुरावर वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एका सहकाऱ्याची साथ मध्येच सुटल्याचे दुःख इतर मजुरांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.
पुण्याहून 16 मजूर पायी झारखंडला निघाले होते. ते, 23 मे रोजी रात्री ते वर्ध्यात पोहोचले. रेल्वे स्थानकावर काही व्यक्तींनी त्यांना जेवण दिले. दरम्यान, त्यातील एका कामगाराची प्रकृती 24 मे रोजी सकाळी बिघडल्याने त्याला सामान्य रुग्णालायत आणण्यात आले. त्याला लगेच सेवाग्राम येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत मजुरासह इतर 15 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले असून सर्व 16 कामगार कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी त्या राज्यातील संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी बोलून त्याचा जाण्याचा मार्ग सुकर करण्यात आला.
श्रमिक रेल्वेने नागपूरवरून रवाना
वर्धेतून त्यांना नागपूरपर्यंत एसटीने पाठविण्यात आले. नागपूरहून सुटणाऱ्या श्रमिक रेल्वेने त्यांना हावडा येथे सोडण्यात येईल. तेथून झारखंड शासन त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचे नियोजन करणार असल्याचे वर्ध्याचे माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिली.