वर्धा - आजच्या काळात सोशल मीडिया संपर्काचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. बरेचदा या माध्यमावर नको त्या गोष्टी व्हायरल करणे, अफवा पसरवणे असे उद्योग होतात. त्यामुळे याच माध्यमांवर टीकेची झोड उठलेली पहायला मिळते. मात्र, कोरोनाच्या या संकटकाळात या समाजमाध्यमांद्वारे गरजूंना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावलेले दिसतात. अशीच मदतीची भूमिका वठवण्याचे काम वर्ध्यातील एका संस्थेने केले आहे. कोरोनाच्या काळात सोशल मीडियावरील आवाहनाला भूमिपुत्रांनी 'आपुलकीने' साद दिली आणि गरजू कुटुंबीयांना मदतीसाठी 97 हजाराचा निधी उभा केला.
हेही वाचा...कोरोना मुक्तीचा "इस्लामपूर पॅटर्न! स्थानिक प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे कोरोनावर मात..
'आपुलकी' संस्था ही मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी काम करत असते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या वर्ध्यातील तरुण अभिजित फळके पुण्यात वास्तवव्यास असताना आपल्या भागातील गरजूंना मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याने यापूर्वी अनेक शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्यासाठी आवाहन करत संबंधितांना मदत पोहचवली. यावेळीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यत गरजूंना मदतीसाठी एक हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्याच्या या आवाहनाला अनेकांनी साद दिली. यातील काही देशातील तर काही परदेशातील जे मूळचे भारतीय असलेले होते, ते मदतीला धावून आले.