वर्धा- हिंगणघाट तालुक्याच्या शिरूडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातीलच काही टवाळखोरानी नासधूस केली आहे. शिक्षक काही कामानिमित्त शाळेत पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. मात्र, पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून पोलिसात तक्रार न देता शाळा समितीला या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
शिरूडच्या जिल्हा परिषद शाळेतील साहित्यांची तोडफोड; गावातीलच टवाळखोरांचे कृत्य
शिरूडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातीलच काही टवाळखोरानी नासधूस केली आहे. शिक्षक काही कामानिमित्त शाळेत पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला.
शाळेतील शिक्षक गणेश वाघ हे सोमवारी सकाळी शाळेत गेले. यावेळी शाळेतील शौचालय, बाथरूमचे दार, बेसिंगटाइल्स, पाण्याची टाकी, आरओ युनिटची तोडफोड करून प्रचंड नुकसान केले. गावात विचारपूस दरम्यान गावातीलच काही टवाळखोर पोरांनी हे कृत्य केल्याचे समोर आले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना यातील दोषी मुलांबाबत माहिती देण्यात आली आहे. यावर शाळेतील साहित्याची तोडफोड करून काय फायदा होणार? तसेच हे कृत्य का केले? समजू शकले नाही. यावर गावातच उपाययोजना करण्याची मागणी समितीला शाळेच्यावतीने करण्यात आली. पोलिसात तक्रार केली नसली तरी या टवाळखोराना धडा शिकवणे गरजेचे असल्याचा सूर काही पालकांच्यावतीने गावात दिसून आला.