राष्ट्पिता महात्मा गांधी यांची 75 वी पुण्यतिथी वर्धा : महात्मा गांधी यांची एक जिवंत आठवण म्हणजे वर्धा जिल्ह्यात असलेला सेवाग्राम आश्रम. हीच ती पावन भूमी आहे, ज्या ठिकाणी महात्मा गांधी यांनी वास्तव्य केले होते. त्यांनी तिथून सगळ्या जगभर अहिंसेचा व शांतीचा प्रचार प्रसार केला होता. आजही हा आश्रम त्यांच्या प्रत्येक घटनेची साक्ष देत उभा आहे. सेवाग्राम येथे आजही जगभरातील नागरिक भेटी देण्यासाठी येत आहेत. आजही या सेवाग्राम आश्रमात बापूंच्या वस्तू संग्रहित करून ठेवल्या आहेत. त्यांची प्रत्येक आठवण आजही येथे जिवंत उदाहरण म्हणून जतन करून ठेवली आहे.
तापत्या उन्हात खादीचा गारवा : वर्धा जिल्ह्याचे गेल्या काही दिवसातील सर्वाधिक तापमान 45.1 इतके राहिले आहे. याच तापत्या उन्हात गारवा देणाऱ्या खादीवर मात्र रोडावलेली पर्यटकांची संख्या परिणाम करत आहे. सेवाग्राम आश्रमात पर्यटकांची संख्या रोडवल्याने खादीची विक्री देखील कमी व्हायला लागली आहे. पण ऋतूनुसार अनुकूल असणाऱ्या या खादीच्या विक्रीत रोडावलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे परिणाम झाला आहे.
रोजगार निर्मितीसाठी मोलाची भूमिका : रोजगार निर्मितीसाठी मोलाची भूमिका असणाऱ्या खादीची निर्मिती आजही सेवाग्राम आश्रमात होते. रोजगार निर्माण करणारा खादीचा कापड सेवाग्राम आश्रमात तयार होतो. कापूस ते कापड असाच हा उपक्रम सर्वत्र गावगावात पोहचविण्यासाठी गांधीवादी धडपड करीत आहेत. ज्याप्रमाणे अन्नाच्या बाबतीत आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे वस्त्राबाबत देखील गाव स्वावलंबी होणे महात्मा गांधीजींना अपेक्षित होते. चरख्याच्या साहाय्याने कताई, बुनाई करीत सेवाग्राम आश्रम आजही खादी वस्त्र तयार करीत आहेत. शुद्ध खादी तयार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
चरख्याचा वापर करून सूत निर्मिती : सेवाग्राम आश्रमातील बापू कुटी परिसरातच बाजूला खादी युनीट आहे. या युनिटमध्ये महिला चरख्याचा वापर करून सुताची निर्मिती करतात. हातमागावर ताना - बाणा ठीक करीत कापसापासून कापड निर्मिती केली जाते. शेतकऱ्याने पिकविलेला कापूस कष्ट करणाऱ्या हातातून प्रक्रिया होत कापड बनून ग्राहकांपर्यंत पोहचतो. देश विदेशातून येथे पोहचणाऱ्या पर्यटकांना या खादीचे आकर्षण राहिले आहे. पण यावर्षी तापमानाचे चटके वाढल्याने पर्यटक सेवाग्राम आश्रमापर्यंत पोहचत नसल्याचा अनुभव आहे.
दिग्गजांनी विविध प्रजातींची झाडे लावली : महात्मा गांधींनंतर येथे अनेक दिग्गजांनी विविध प्रजातींची झाडे लावली आहेत. ज्यात 1942 मध्ये कस्तुरबा गांधी यांनी बकुळाचे झाड लावले होते. त्यांनतर, आचार्य विनोबा भावे यांनी 1965 मध्ये पिंपळाचे झाड लावले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2019 मध्ये रक्त चंदनाचे झाड लावले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2014 सली बकुळाचे झाड लावले, 2016 साली मेनका गांधी यांनी आवळ्याचे झाड लावले, सोनिया गांधी, राजीव गांधी, डॉ प्रणव मुखर्जी, डॉ मनमोहन सिंग यांच्यासारख्या दिगग्ज मंडळींनी इथे वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. पर्यटकांना अगदी हवाहवासा वाटणारा निवांतपणा याठिकाणी मिळतोय. आताही हे डेरेदार वृक्ष याठिकाणी कायम आहे. सध्या प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संगोपन चळवळ उभी केली जात आहे. काळाची गरज ही आहे याच पार्श्वभूमीवर सध्या स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम हा वृक्षसंवर्धनाचाही संदेश देत आहे असे म्हणायला हरकत नाही.
वाढत्या तापमानाचा पर्यटनावर परिणाम : हिवाळ्यात दररोज सातशेच्या घरात असणारी पर्यटक संख्या सध्या दिवसाला तीनशे ते चारशेवर आली आहे. उन्हे वाढत असल्याने बाहेर राज्यातून येणारे आणि सहलीचे विद्यार्थी केवळ आश्रमात पोहचत आहेत. मागील काही दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले आहे. उन्हाच्या तप्त झळांनी सारेच बेजार आहेत. काही दिवसांपासून वर्ध्याचे तापमान हे 45 अंशाच्या घरात आहे. यामुळे सगळीकडे लाहीलाही होताना दिसत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान वाढले आहे. काही जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पारा 45 अंशांच्या पार गेला. वर्ध्याचेही तापमान 45.5 अशांवर सरकले होते. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचाही धोका आहे. सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मोजकेच पर्यटक, विद्यार्थी किंवा इतर राज्यांतील व्यक्ती आश्रमाला भेट देत आहेत.
वृक्षाचे महत्व नागरिकांना पटवून दिले : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी वर्ध्यात आल्यानंतर 1936 मध्ये पिंपळाचा वृक्ष लावून वृक्षाचे महत्व नागरिकांना पटवून दिले होते. हे वृक्ष आजही येथील पर्यटकांना सावली सह प्राणवायू आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आहे. याच ठिकाणाहून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली,, त्यामुळे सेवाग्राम आश्रम हे स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार आहे. आजच्या डिजिटल युगात देखील येथील बापू कुटी, बा कुटी, आखरी निवास महादेव कुटी, किशोर कुटी या ऐतिहासिक ठेवा असलेला सेवाग्रामचा गांधी आश्रम वृक्ष संवर्धनाचा देखील संदेश देत आहे.
हेही वाचा :Mahatma Gandhi Death Anniversary 2023 : 75वी पुण्यतिथी, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जग जिंकणारे 'बापू'