स्थलांतरितांचे समुपदेशन; कुटुंबीयांपासून दुरावा नाही तर सुरक्षा, आरोग्य विभागाचा उपक्रम - स्थलांतरितानाचे समुपदेशन
कोरोनामुळे कुटुंबीयांपासून दूर असणाऱ्या मजुरांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये. तसेच मानसिक स्थिती उत्तम रहावी, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून स्थलांतरितानाचे समुपदेशन करण्यात येत आहे. ५३ ठिकाणी समुपदेशन वर्ग घेतले जात असून गेल्या २२ दिवसात २ हजार १८२ स्थलांतरितांचे समुपदेशन करत त्यांना मानसिक नैराश्येतून बाहेर काढले आहे.
वर्धा - कोरोमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात सर्वात जास्त अडचणीत सापडलेला वर्ग म्हणजे स्थलांतरित. या परराज्यातून आलेल्याना थांबवून त्यांची काळजी घेण्याचे काम प्रशासन करत आहे. केवळ खाणे आणि राहण्याच्या सोयीने मार्ग सुटणार नसल्याने यात काळजी घेण्यासाठी पाऊले उचलत समुपदेशन केले जात आहे. मागील एक महिन्याच्या कालावधीत 2 हजारापेक्षा जास्त लोकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. हा कुटुंबीयांपासून दुरावा वाटत असला तरी त्यांचा सुरक्षेचा प्रश्न असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सुमारे ८ हजारांच्यावर मजुरांना वर्धा जिल्ह्यातील विविध निवारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी जेवणासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण कोरोनामुळे कुटुंबीयांपासून दूर असणाऱ्या मजुरांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये. तसेच मानसिक स्थिती उत्तम रहावी, या उद्देशाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात 'मानसिक आरोग्य' कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यासाठी आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या ५३ चमू तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी शारीरिक अंतराचे पालन करून त्यांचा वर्ग घेण्यात आला. या समुपदेशनातून नैराश्यावर मात कशी करता येते. याचे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये समुपदेशक रिता थूल, मिलन वहाणे, नितीन साखरे, प्रफुल्ल काकडे, ज्योत्स्ना गावंडे, देवांगणा वाघमारे, प्रिया गुप्ता, प्रणिता दखने, हर्षद ढोबळे, दीपाली इंगळे, वैशाली साबळे आदि ही जवाबदारी पार पाडतात. आतापर्यंत 2 हजार 182 जणांचे समुपदेशन करत त्यांना नैराश्येतून बाहेर काढले आहे.