वर्धा - कोरोनामुळे आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या साडेतीन हजार मजुरांची व्यवस्था स्थानिक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम केल्यामुळे शक्य झाली आहे. स्वयंसेवी संस्थांनी संकटाच्या काळात घेतलेला पुढाकार माणुसकी शिकवणारा आहे. असे प्रशंसोद्गार पालकमंत्री सुनील केदार यांनी वर्धेतील सामाजिक संस्थांचे आभार मानताना काढले.
विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकित उसस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते विश्रामगृहात आयोजित सामाजिक संस्थांच्या बैठकीत पालकमंत्री केदार बोलत होते. यावेळी आमदार रणजित कांबळे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, डॉ सचिन पावडे, सचिन अग्निहोत्री प्रदीप बजाज तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुदैवाने वर्धा अजून कोरोनामुक्त आहे. हा जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी जिल्ह्याच्या नागरिकांनी केलेले सहकार्य महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यात कुणीही उपाशी राहू नये, यासाठीसुद्धा जिल्ह्यातील दानशूर आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार कौतुकास्पद आहे. गांधी जिल्ह्याची शान आपण कायम राखली, असे प्रशंसोद्गार पालकमंत्री केदार यांनी काढले.
शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबांना शासनाकडून अन्नधान्य मिळत आहे. पण, अनेकांची किराणा घेण्याचीसुद्धा परिस्थिती नाही. अशा लोकांना सामाजिक संस्थांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, मदत करत असताना सर्वांना समान मदत पोहचली पाहिजे. यासाठी स्थानिक तहसीलदार, मुख्याधिकारी किंवा प्रशासनातील इतर नियुक्त अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून काम केल्यास डुप्लिकेशन होणार नाही याची काळजी घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला वैद्यकीय जनजागृती मंच, अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, सेवा फाउंडेशन, मेहेर सेवाभावी संस्था, ऑल इंडिया बीएसइफएक्स, सर्विसमेन वेलफेअर असो, ओबीसी जनजागृती संघटन, युथ फॉर चेंज, जयहिंद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, युवा सोशल फोरम, मराठा सैनिक वेल्फेअर, हौशी योग्य असोसिएशन, बोहरा समाज वर्धा, वर्धा सोशल फोरम, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हेल्पिंग हार्टस, विश्व हिंदू महासंघ, जिव्हाळा सेवाभावी संस्था, प्रहार वाहनचालक संघटना, लायन्स क्लब, जिल्हा अन्नदान समिती, रोटरी क्लब गांधी सिटी इत्यादी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.