वर्धा - बँकांनी किरकोळ कागदपत्राच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे नामंजूर करू नये. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची यादी व पीक कर्ज मिळण्यास पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेंच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर लावण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज (सोमवार) शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वितरण संबंधित आढावा बैठक आयोजित बँकर्स प्रतिनिधींना निर्देश दिले.
कोरोनामुळे देशासह राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थचक्र फिरू शकेल. यासाठी शेतकरी हा विकासाचा केंद्र बिंदू समजून त्याला प्राधान्याने विविध शेतीपूरक व्यवसायांसाठी बँकांनी कर्जपुरवठा करावा, असे निर्देशही पालकमंत्री केदार यांनी दिलेत. 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या खरीप कर्जासाठी केवळ सातबारा, आठ-अ उतारा, आखीव प्रमाणपत्र, चालू फेरफारपंजी या कागदपत्रांचीच आवश्यकता आहे.