वर्धा -मागील वर्षभरापासून अनेक कारणांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांची वागणूक वादग्रस्त ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मानकर यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. नवनियुक्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर शुक्रवारी या तक्रारींचा पाढा वाचला गेला आणि ढीगभर तक्रारी पाहून पालकमंत्र्यांनी मानकर यांना चांगलेच फैलावर घेत खडे बोल सुनावले. तसेच त्यांच्याविरुद्ध लवकर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.
ज्यांच्यासाठी हा विभाग आहे, ज्यांच्या कामाकरिता इथली पदे आहेत, त्या शेतकऱ्यांनाच मानकर वेळ नसल्याचे सांगून भेटीसाठी टाळाटाळ करत होत्या. शेतकऱ्यांना वेळ नसल्याचे सांगणे आणि उर्मट भाषेचा उपयोग करणे, अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात करण्यात आल्या आहेत.
पॉलिहाऊस आणि शेडनेटमुळे देशोधडीला लागलेले त्रस्त शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांना भेटायला गेले. मात्र, त्यांना वेळ नाही, असे सांगत सहा दिवसांनी या, असे लिखित स्वरुपात लिहून दिले. आत्महत्या करण्याची वेळ आली दोन मिनिटे एकूण घ्या, म्हटल्यानंतरसुद्धा वेळ नसल्याचे सांगणाऱ्या कृषी अधीक्षकांची ही वागणूक शेतकऱ्यांना अवाक करणारी होती. अशाच तक्रारींचा पाढा आज पालकमंत्री बावनकुळे यांच्यासमोर वाचला गेला. कृषी अधीक्षकांच्या गैरवागणुकीला अनेकांनी दुजोरा दिला. यावेळी एका बातमीचा उल्लेख करत बैठकीतच 21 विभागाचे प्रमुख उपस्थित असताना पालकमंत्र्यांनी त्यांची कानउघडणी केली. तसेच यापुढे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याचा विचार करावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी कृषी अधीक्षक विद्या मानकर यांना दिल्यात.