वर्धा- महात्मा गांधी-विनोबांचा वारसा लाभलेला हा जिल्हा आहे. युवा ही देशाची अशी शक्ती असते, जी स्वप्ने पाहते, त्या स्वप्नांना विचारांची जोड देते आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीतून समाज आकाराला येतो. आपल्या स्वप्नांना आयाम देताना गांधींजी ज्याप्रमाणे साधेपणाने जगले, त्या प्रमाणे युवा पिढीने आयुष्य जगण्याचा वसा घ्यावा, असे आवाहन तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षान्त समारंभात केले.
सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित या पदवीदान समारंभात बनवारीलाल पुरोहित यांचे हस्ते गुणवंत डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध आयुर्विज्ञान शाखांतील एकूण ७१६ विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून आरोग्यसेवेची दीक्षा प्राप्त केली.
विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदकांनी गुणगौरव....
या दहाव्या दीक्षान्त समारोहात वैद्यकीय शाखेतील अक्षदा शर्मा ही विद्यार्थिनी सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली. तिला ८ सुवर्ण पदके व ३ रोख पुरस्कार प्राप्त झाली. यासोबतच, श्यामोलिमा भुयान हिला ५ सुवर्ण पदके व १ रोख पुरस्कार, शरण्या राय हिला ३ सुवर्ण पदके व १ रोख पुरस्कार, सुषमा एस. हिला २ सुवर्ण व २ रजत पदके, प्रियाल मुंधडा हिला २ सुवर्ण पदके प्राप्त झाली. स्नातकोत्तर अभ्यासक्रमातील एम. डी. मेडिसिनचे डॉ. अमित डफळे यांना ७ सुवर्ण पदके तर एम. डी. सर्जरीचे डॉ. विवेक सिन्हा यांनी ४ सुवर्ण पदके प्राप्त केली. आयुर्वेद अभ्यासक्रमात रोझिना शेख रझा ही सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली असून तिला ३ सुवर्ण, १ रजत पदक व ३ रोख पुरस्कार प्राप्त झाले. तर दंतवैद्यक शास्त्राची विद्यार्थिनी मेघा अग्रवाल ही ३ सुवर्ण पदकांची मानकरी ठरली.
या समारंभात कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचा शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समारंभात वैद्यकीय शाखेतील ३४२ आणि दंतविज्ञान शाखेतील १५९ (पीएचडी, एमडी, एमएस, स्नातकोत्तर, स्नातक), आयुर्वेद शाखेतील ७१, परिचर्या विज्ञान शाखेतील १३७ तर परावैद्यकीय शाखेतील ७ विद्यार्थ्यांसह एकूण ७१६ विद्यार्थी कुलपतींकडून आरोग्यसेवेची दीक्षा घेतील. यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना एकूण ८६ सुवर्ण पदके व ७ रौप्य पदकांसह १३ चान्सलर अवॉर्ड आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात ३५ विद्यार्थ्याना फेलोशीप तर वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, परावैद्यकीय आणि परिचर्या शाखेतील एकूण ७४ विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला. तर १३ विद्यार्थ्यांना यावेळी आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.
समारंभाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. तत्पूर्वी संजना बासू हिने पसायदान सादर केले. दीक्षान्त समारोहाला समारोहाला कुलगुरू डॉ. राजीव बोरले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, डॉ. सतीश देवपुजारी, प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, डॉ. एस. एस. पटेल, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, डॉ. ललित वाघमारे, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधीन्द्र बालिगा, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, परिचर्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सीमा सिंग, यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख मंचावर उपस्थिती होती. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांसोबतच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.