वर्धा -कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एचटीबीटी बियाणांची लागवड केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, हिंगणघाट तालुक्यातील शेगाव कुंड येथील शेतकऱ्यांनी या बियाणांची लागवड केली आहे. यावर कारवाई करण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी आमच्या शेतात येऊन दाखवावे, असे आव्हान आज शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशीकर यांनी केले आहे.
शेतकरी इतक्या उन्हात वखराच्या पाळ्या घालू शकतो, शेती करु शकतो तर तो सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात दोन हातही करु शकतो. शेतकरी हा काही लेचापेचा नसून ताकदवार आहे, असे आमदार सरोज काशीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शेतकऱ्याला त्याच्या शेतात काय पेरावे याचे स्वातंत्र आहे. त्यामुळे त्याला कोणी रोखू शकत नाही. याची जागृती ही आंदोलनाच्या माध्यामातून करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. याचबरोबर इतर जिल्ह्यात ही जनजागृतीसाठी आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.