वर्धा - पालकमंत्री सुनिल केदार यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्हाभर दौरा करत तत्काळ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा, अशा सूचना दिल्या होत्या. पण देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी केली जात नव्हती. तेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यानंतर देवळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, हा प्रश्न तात्पुरता सुटला असला तरी, सद्य स्थितीला कापूस खरेदीची ही परिस्थिती असल्याने, पालकमंत्री यांच्या दौऱ्याचे फलित काय? असा प्रश्न उपास्थित होत आहे.
खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. यामुळे शेतकरी काबाडकष्ठ करुन पिकवलेला कापूस विकून, त्या पैशातून खरीपाच्या हंगामासाठी बी-बियाणे, खते घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच शेतकऱ्याला लॉकडाऊनमुळे कापूस विकता आलेला नव्हता. अशात देवळी कृषी उत्पन्न बाजरी समितीमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. तेव्हा शेतकऱ्यांना गाड्या आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार शेतकऱ्यांनी रात्रीपासून बाजार समितीच्या आवारात कापूस भरलेल्या गाड्या आणल्या. पण दुपार होऊनही कापूस खरेदी करण्यासाठी ग्रेडर नसल्याने कापूस खरेदीला सुरुवात झाली नाही.
संतप्त शेतकऱ्यांनी केलेला रस्ता रोको... शेतकऱ्यांनी हा प्रकार राजेश बकाने यांच्याशी संपर्क साधून सांगितला. पण यावरही काही उपाय न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. यावेळी देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हलकर यांनी घटनास्थळी पोहचून शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी ही माहिती एपीएमसीच्या पदाधिकाऱ्यांना कळवली. तेव्हा यावर तोडगा निघाला. तीन जिनिंमध्ये प्रत्येकी 50 गाड्या कापूस पाठवत खरेदी केला जाईल, असे लेव्हलकर यांनी सांगितले. यामुळे शेतकरी शांत झाले आणि त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे फलित काय -
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हाभर दौरा करत 14 जिनिंग आणि सीसीयांच्या अधिकाऱ्यांना घेऊन दौरा केला. रोज जास्ती जास्त शेतकऱ्यांच्या कापूस गाड्या खाली करून घेण्याचा सूचना दिल्या होत्या. जिनिंग चालकांचे प्रश्न समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला. असे असताना जिल्ह्यात अजूनही कापूस खरेदीला गती आलेली नसल्याचे चित्र देवळी शहरात दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होत नसेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे रास्ता रोको करावा लागत असेल, तर पालकमंत्र्यांच्या त्या दौऱ्याचे फलित काय ? असा प्रश्न शेतकरी वर्ग विचारत आहे.
हेही वाचा -एसटी महामंडळाचे दोन लाखांचे दैनंदिन उत्पन्न २५ हजारांवर; प्रवाशांचा प्रतिसाद वाढण्याची प्रतिक्षा
हेही वाचा -बाबाजी का लंगर..! लॉकडाऊन काळात गरजूंसाठी २४ तास खुला, 20 लाख वाटसरूंची भागवली भूक