महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'धाम' ओव्हरफ्लो, बाप्पांनी केले जलसंकट दूर - धाम प्रकल्प

वर्धा शहर आणि गावांसह उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या धाम प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'धाम' ओव्हरफ्लो

By

Published : Sep 4, 2019, 5:02 PM IST

वर्धा- यंदा सुरवातीलाच पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै मध्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामध्ये वर्धा शहर आणि गावांसह उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या धाम प्रकल्प तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'धाम' ओव्हरफ्लो

धाम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकर्‍यांना वर्षभर रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार आहे. सोबतच वर्धा शहर आणि पिपरीसह 11 गावे आणि उद्योगांनाही पाणी मिळणार आहे.

आर्वी तालुक्यात धाम नदीवरील महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे. याच धाम नदीवरून शहरासह 11 गावे तसेच एमआयडीसी, रेल्वे, उद्योगांना पाणी पुरवठा होतो. गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान पाहता सप्टेंबर महिन्यापासूनच पाणी कपातीला सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 15 दिवसांनी सुरू होता. मे, जून महिनाअखेर कोरडा ठाक पडलेल्या प्रकल्पातील मृत जलसाठा उपसा करत वर्ध्याची तहान भागवण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ 37 टक्के पाणी साठा होता. तोच धाम प्रकल्प यंदा 100 टक्के भरला आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती -

जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये एकूण 63.92 टक्के जलसाठा सध्या असून 8 प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यात धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प,पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल-नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प आणि सुकळीच्या लघु प्रकल्पाचा समावेश आहे. तर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या नांद प्रकल्प आणि वडगाव प्रकल्पामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर २० लघु प्रकल्पांपैकी १० प्रकल्प पूर्ण भरले आहे. धाम मध्यम प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 328.66 मीटर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details